Join us

निशिकांत कामतच्या रुपानं हुशार दिग्दर्शक आणि गुणी अभिनेता हरपला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 3:26 AM

२००६ मध्ये या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

मुंबई : वेगळ्या वाटेवरच्या मराठी सिनेमांची सुरुवात झाल्यानंतर ज्या नवीन दमाच्या दिग्दर्शकांनी दमदार एन्ट्री घेतली त्यातील निशिकांत कामत हे एक प्रमुख नाव. २००५ मध्ये आलेल्या ‘डोंबिवली फास्ट’ या पहिल्याच सिनेमाद्वारे त्यांनी वेगळेपण सिद्ध केले. २००६ मध्ये या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.‘डोंबिवली फास्ट’ चित्रपटाचा तमिळ भाषेतील रिमेक, ‘एवानू ओरुवन’ याचे दिग्दर्शनही त्यांनी केले. गोव्यातून मुंबईत परतल्यावर त्यांनी मनोरंजन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला जाहिरातपटांसाठी साहाय्यक म्हणून काम केले. तीन वर्षे संकलक, त्यानंतर सात वर्षे टीव्ही मालिकांसाठी दिग्दर्शन केले. मग चार वर्षे लेखनाची कामे केली आणि अखेर अशा १५ वर्षांच्या कारकिर्दीनंतर पहिला सिनेमा केला तो म्हणजे डोंबिवली फास्ट. पाठोपाठ, ‘मुंबई मेरी जान’ या सिनेमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या या कामाची दखल हिंदी सिनेसृष्टीनेही घेतली आणि अब्बास-मस्तान यांनी निशिकांतशी संपर्क साधला. हळूहळू त्यांनी या क्षेत्रावर स्वत:चा ठसा उमटविण्यास सुरुवात केली. ‘हवा आने दे’ या सिनेमात त्यांनी अभिनयही केला होता. ‘सातच्या आत घरात’, ‘फुगे’, ‘रॉकी हॅण्डसम’ या सिनेमांतही त्यांनी काम केले. रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लय भारी’ या सिनेमाने आणि अजय देवगण-तब्बू यांच्या ‘दृश्यम्’ या सिनेमांद्वारे निशिकांत यांनी चित्रपटसृष्टीत पाय घट्ट रोवले.मुंबईकर निशिकांत कामत यांचा जन्म १७ जून १९७० रोजी दादरमध्ये झाला. त्यांचे बालपण ताडदेवमध्ये गेले. आई-वडील हे दोघेही शिक्षक होते. निशिकांत यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालयात झाले. तिथेच एकांकिकांच्या माध्यमातूून त्यांच्यातील कलाकाराला वाव मिळाला. पुढे त्यांनी गोव्यातून हॉटेल मॅनेजमेंटचीही पदवी घेतली. अलीकडेच त्यांनी टीव्ही मालिका आणि वेब सिरिजच्या माध्यमातून निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला होता.>निशिकांत कामत यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. चित्रपट माध्यमावर प्रेम करणारा उमदा, संवेदनशील अभिनेता आणि गुणी दिग्दर्शक आपण गमावला आहे.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री>निशिकांतसोबत माझे संबंध फक्त दृश्यम् या चित्रपटापुरतेच नव्हते तर त्यापलीकडेदेखील होते. मी त्याचा नेहमी आदर करतो. निशिकांत हसतमुख आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. तो खूपच लवकर निघून गेला.- अजय देवगण, अभिनेता>निशिकांत तू जे ठरवलं होतंस तेच तू केलंस व तसाच जगलास आणि जगाचा निरोपदेखील घेतलास. मला खात्री आहे की तुला कोणत्या गोष्टीबद्दल दु:ख नसेल. तू आम्हाला दिलेल्या सर्व चित्रपटांसाठी आणि गोष्टींसाठी धन्यवाद. - रणदीप हुडा, अभिनेता>वाईट बातम्या थांबता थांबत नाहीत. निशिकांतच्या रूपाने एक मित्र आणि सर्जनशील सहकारी गमावल्याचे दु:ख आहे. निशिकांत एक चांगला माणूस होता; त्याचप्रमाणे त्याची विचार करण्याची पद्धत आणि कथाकथनाची पद्धतदेखील चांगली होती.- रोनी स्क्रूवाला, निर्माता>निशिकांतच्या निधनाची बातमी ऐकून फार वाईट वाटले. आपण एक चांगला दिग्दर्शक आणि मित्र गमावला आहे. निशिकांत हा अत्यंत उत्साही माणूस होता. तो आपल्यातून फार लवकर निघून गेला.- नील नितीन मुकेश, अभिनेता

टॅग्स :निशिकांत कामत