मुंबई: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझमध्ये सुरू असलेल्या पार्टीचा पर्दाफाश करत (Mumbai Cruise Party Raid Case) एनसीबीने आतापर्यंतची मोठी कारवाई केली. यामध्ये अनेकांना अटक करण्यात आली असून, बॉलिवूडमधील बडा अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) समावेश असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. किला कोर्टाने आर्यन खानला जामीन नाकारल्याने त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर आक्षेप घेत अनेक दावे केले आहेत. यावेळी भाजपवरही निशाणा साधला. यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर देत ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांची आदळआपट सुरू आहे का, असा थेट सवाल विचारला आहे.
क्रूझ ड्रग्स प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली असून, आता एनसीबीने या प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानच्या वाहन चालकाला चौकशीसाठी बोलावले आहे. आतापर्यंत खान कुटुंब किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची चौकशी झालेली नाही. दरम्यान, क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात NCBने एकूण ११ जणांना ताब्यात घेतले होते. मग यातील तिघांना कुणाच्या निर्देशावरून सोडण्यात आले, असा प्रश्न मलिकांनी उपस्थित केला आहे. अवघ्या तीन तासांतच भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, प्रतिक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांना सोडण्यात आले, असा दावा करत भाजपवर टीका केली. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे.
‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांची आदळआपट सुरू आहे का
नवाब मलिक यांची आदळआपट का सुरू आहे, कारण तो खान आहे, सुशांत सिंह राजपूत नाही. तसेच खान नाव असल्यामुळे तो पीडित आहे का आणि सुशांत हिंदू होता, त्यामुळे तो ड्रग्ज अॅडिक्ट झाला का, अशी विचारणा नितेश राणे यांनी ट्विटरवरून केली आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे. तसेच समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर टाकलेली धाड ही बनावट आणि नियोजित होती. फर्जीवाडा करुन, बातम्या पुरवल्या. १३०० लोकांच्या जहाजावर ११ जणांनाच ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी तिघांना का सोडण्यात आले, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.