मुंबई – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून चांगलाच वाद पेटला आहे. या विधानामुळे भाजपा आणि अजित पवार गटातील तणाव वाढला आहे. पडळकरांना देवेंद्र फडणवीसांनी आवर घालावं अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली होती. त्यावरून आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी गोपीचंद पडळकरांची पाठराखण केली आहे.
आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटलं की, मित्रपक्षांनी दादांवर टीका करणे म्हणजे दादांचा अपमान, मग महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांवर संजय राऊत उठसूट टीका करत होते. अजितदादांविरोधात अग्रलेख लिहायचे ते कसे चालायचे? त्यांना कोणाचा आशीर्वाद होता मग? गोपीचंद पडळकर आणि संजय राऊतांना वेगळा न्याय का? संजय राऊतांना मूक संमती होती का? असे परखड सवाल त्यांनी विचारले आहेत.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. याबाबत पत्रकारांनी पडळकरांना प्रश्न विचारला की, तुम्ही अजित पवारांना पत्र का पाठवलं नाही? त्यावर ते म्हणाले की, 'अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे', अशी टीका त्यांनी यावेळी केली होती. त्याचसोबत सुप्रिया सुळे यांनाही लबाड लांडग्याची लेक, म्हटलं होतं. पडळकरांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पडळकरांवर त्याच भाषेत टीका केली. गोप्या म्हणत पडळकरांना डुकराची उपमा मिटकरी यांनी दिली होती.
देवेंद्र फडणवीसांनी कान टोचले
गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे, तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशाप्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये, असे माझं स्पष्ट मत आहे अशी भूमिका मांडत देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांचे कान टोचले.