मुंबई - संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणेंना न्यायालयाकडून जामिन मिळाल्यानंतर ते सिंधुदुर्गला रवाना झाले. जामिन अर्जाची पूर्तता करण्यासाठी ते सावंतवाडी जिल्हा कारागृहात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. नितेश राणेंना जामीन मंजूर होताच भाजप आणि राणे समर्थकांनी जल्लोष केला. तर मुंबईत राणेंच्या फोटोंसह कविता लिहून बॅनरबाजीही करण्यात आली आहे. त्यावरुन, राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नितेश राणेंचा जामिन मंजूर झाल्यानंतर राणे समर्थकांनी मुंबईच्या रस्त्यांवर बॅनरबाजी केली. या बॅनर्सवर प्रेरणादायी कविता लिहिल्या आहेत. घाबरून जगू नकोस, मान झुकवू नकोस, प्रवास अवघड आहे, पण थांबून हार मानू नकोस, तू योद्धा आहेस… हे तुझे कुरुक्षेत्र…. अशा आशयाचे बॅनर झळकल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी रात्री उशिरा जुहू परिसरातील काही बॅनर उतरवले. तसेच बॅनर लावलेल्या व्यक्तीलाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले.
जामीन होताच काय म्हणाले राणे
मी कोणत्याही तपास कार्यातून लांब गेलो नव्हतो. तपास कार्यात कोणताही अडथळा आणला नाही. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होतो. मला अटक केली नाही तर मी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालो. हे सरकार मला अटक करु शकले नाही. या सर्व प्रकरणावर मी बोलणार आहे. ज्या दिवशी मी बोलणार त्या दिवशी मात्र अनेकांना बीपीचा त्रास सुरू होईल असा इशाराच यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा
जामिन मिळाल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आपण दोन दिवस आराम करणार असल्याचे सांगितले होते. परंतू, थोड्या वेळातच ते गोव्यात नरेंद्र मोदींच्या सभेला पोहोचल्याने चर्चा सुरु झाल्या होत्या. नरेंद्र मोदींची सभा संपल्यावर नितेश राणेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी शिवसैनिक हल्ला प्रकरण, अटक या घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.