Join us

Nitesh Rane: ‘पोलिसांवर मुख्यमंत्र्यांचा दबाव, सीडीआर काढा, सगळं समोर येईल’, नितेश राणेंचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 1:54 PM

Nitesh Rane News: भाजपा आमदार नितेश राणे यांनीही पोलीस खात्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आणि दबाव असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांनंतर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनीही पोलीस खात्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आणि दबाव असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

नितेश राणे म्हणाले की, पोलिसांवर मातोश्रीवरून दबाव असतो. काही पोलीस अधिकारी आमच्याही विचारांचे आहेत, ते आम्हाला माहिती देत असतात, त्यांचं म्हणणं आहे की, पोलीस खात्यामध्ये थेट मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे. तुम्ही या कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याचा जर सीडीआर रिपोर्ट तपासला तर त्यांना थेट मुख्यमंत्र्यांचा फोन येत असल्याचे समोर येईल. जर थेट मुख्यमंत्र्यांचे आदेश, हस्तक्षेप असेल तर पोलिसांकडून अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. त्यामुळे आता ही रस्त्यावरची लढाई झाली आहे. ही आता थेट संघर्षाची लढाई झाली आहे. जर पोलीस आता आम्हाला सुरक्षा द्यायलाच तयार नसतील. त्यांना शिवसेना आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून वापरलं जात असेल तर आम्हालाही आमच्या संरक्षणासाठी पुढे येऊन सज्ज व्हायला लागेल. म्हणून दगडाची भाषा होत असेल तर भाजपाचा कार्यकर्ताही दगड उचलायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिले.

यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा चहा पितानाचा व्हिडीओ ट्विट करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनाही नितेश राणे यांनी टोला लगावला. ते म्हणाले, मुळात संजय पांडे यांना अशा पद्धतीचा व्हिडीओ ट्विट करावा लागतोय हेच त्यांचं मोठं अपयश आहे. पोलीस खात्याला स्वत:ला सिद्ध करावं लागतंय हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही. लोकांचा पोलिसांवर विश्वास आहे. मात्र त्यांनी ज्याप्रकारे स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तिथेच ते हरले. नवनीत राणा ह्या लोकांमधून निवडून गेलेल्या आहे. त्या काही संजय राऊतांसारख्या राज्यसभेवर निवडून गेलेल्या नाहीत, असे सांगत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली.  

टॅग्स :नीतेश राणे उद्धव ठाकरेपोलिसराजकारण