मुंबई : कमला मिल जळीत कांडानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्याचे फक्त नाटक केले. आता पालिकेने सर्व हाॅटेलवाल्यांना 15 दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत केवळ सेटलमेंटच्या हेतूने देण्यात आलेली आहे. या मुदतीनंतर कुणावरच केली जाणार नाही. त्यामुळे स्वाभिमान संघटना 15 जानेवारी रोजी मुंबईकरांचा मोर्चा काढणार असल्याची घोषणा काँग्रेस आमदार व स्वाभिमानचे अध्यक्ष नितेश राणे यांनी केली. पालिकेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मुंबईकरांशी कसलेच देणेघेणे नाही त्यामुळे पालिकेला टाळे ठोकायला हवे, असेही राणे म्हणाले.
कमला मिल जळीतकांडानंतर महापालिका प्रशासन मुंबईकरांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. ३२५ रेस्टॉरंटवर कारवाई सुरू असल्याचा दावा केला. अचानक इतकी मोठी कारवाई केली याचा अर्थ या सर्व ठिकाणी अनधिकृत अनियमितता असल्याची कल्पना होती. दोन दिवस धडक तोडक कारवाई करण्याचा फार्सनंतर आता पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. केवळ सेटलमेंटसाठी ही मुदत आहे. या कालावधीत ज्यांना जिथे पैसे पोहचवावे यासाठीच या मुदतीचा फार्स असल्याचे नितेश राणे म्हणाले.
दोन दिवस तोडक कारवाईचा देखावा झाला. फक्त झाडं-रोप तोडली. ख-या अर्थाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची हिंमतच नाही. स्वतः आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची कबुली दिली आहे. त्यामुळे सर्व अधिकारी मंडळीवर नियमानुसार कारवाई करत तुरूंगात टाकले पाहिजे. ते सोडून आता माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा डाव आखण्यात येत आहे. जेणे करून भविष्यात कोणी पालिकेच्या विरोधात काही बोलू लिहू नये, यासाठी कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा डाव आहे.
पालिका आयुक्तांनी कारवाई करू नये यासाठी बड्या धेंड्यांचा दबाव असल्याचे स्वतः आयुक्तच सांगतायत. खरे तर आयुक्तांनी या सर्व बड्या धेंडांची नावे जाहीर करावी, अशी मागणी राणे यांनी केली.
कोण आहे बाळा खोपडे ?
बाळा खोपडे नावाची व्यक्ती हॉटेलात परवानगी, अोसी मिळवायची असेल तर ही व्यक्ती थेट काम करुन देते. त्याच्याकडे रेटकार्ड तयार आहे. त्याला आमदार , खासदार किंवा नगरसेवकाची गरजच नाही. या व्यक्तीवर कारवाई करण्याची हिंमत आयुक्तांनी दाखवावी. त्यांनी ही हिंमत दाखवल्यास गेट वे अाॅफ इंडियावर जाहीर सत्कार करेन.
सीबीआय चौकशी करा
कमला मिलची सर्व चौकशी पारदर्शक होण्यासाठी आयुक्तांकरवी नव्हे तर सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करावी.
रूफटाॅपला विरोध नाही
रूफटाॅपच्या संकल्पनेला आमचा विरोध नाही. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी करायला हवी. जगभरात अनेक मोठ्या शहरात नाईट लाइफ व रूफटाॅप आहे. त्यामुळे या धोरणातील त्रुटी दूर करून योग्य अंमलबजावणी करावी.