Nitesh Rane: संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा; नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 10:55 AM2021-09-06T10:55:10+5:302021-09-06T10:55:39+5:30
Nitesh Rane Letter to Javed Akhtar: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं समर्थन करणारे देखील तालिबानी प्रवृत्तीचे असल्याचं विधान प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलं होतं.
Nitesh Rane Letter to Javed Akhtar: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं समर्थन करणारे देखील तालिबानी प्रवृत्तीचे असल्याचं विधान प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना पत्र लिहून या मुद्द्यावर जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा, असं आव्हानच दिलं आहे.
'स्वयंसेवक संघाला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे', गीतकार जावेद अख्तर यांचं विधान
नितेश राणे यांनी जावेद अख्तरांना दोन पानी पत्र पाठवलं आहे. यात नितेश राणे यांनी अख्तरांनी संघाची तुलना तालिबानशी केल्याच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. तसंच असं करणं हा पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. अख्तरांना हिंदुत्वाबद्दल एवढा राग कशासाठी? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
आपण सापाला दूध पाजतोय का? अख्तर यांच्यावर राणेंचा प्रहार
हिंदूत्व मुळातच एक समतोल जीवनशैली आहे. सर्वप्रकारच्या उपासना पद्धती व श्रद्धांना इथं स्थान आहे. त्यामुळेच सहिष्णूता आणि धर्मनिरपेक्षता इथल्या हिंदूंचा स्थायी स्वभाव आहे. त्यामुळेच तर सुप्रीम कोर्टानंही सांगितलंय की हिंदू ही एक जीवनपद्धती व शैली आहे आणि इथल्या संस्कृतीचा गाभा आहे, असं नितेश राणे यांनी पत्रात नमूद केलं आहे.
"तुम्हाला महिलांच्या हक्कांविषयी किती आदर आहे? हे कळून चुकलेलं आहेच. तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात ट्रिपल तलाक सारख्या वाईट परंपरेवर बोलण्याचं धाडस केलं नाही. जी अमानुष परंपरा मुस्लीम स्त्रियांना करार केलेल्या गुलामासारखी वागणूक द्यायची. जी कुप्रथा स्त्रियांच्या आत्मसन्मान पितृसत्तेच्या पायदळी तुडवायची. इस्लामोफोबीया, द्वेष, राइटविंग, फॅसीझम असे शब्द मीडियासमोर वापरुन स्वत:ला फक्त चर्चेत राहायचं आणि सामान्य गरीब मुस्लीम तरुणांमध्ये द्वेष पसरवायचा. पण या गरीब मुस्लिमांसाठी आपण आपल्या आयुष्यात असं काय केलं आहे की ज्यामुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावेल", असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.