Maratha Reservation: “ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता आहे, पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही”: नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 06:52 PM2021-11-24T18:52:06+5:302021-11-24T18:52:47+5:30
Maratha Reservation: भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
मुंबई: भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही आता मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता आहे, पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही, अशी टीकाही राणे यांनी केली आहे.
मी आवर्जून मराठा समाजाला सांगतो हे दोन वर्ष तुम्ही नजरेसमोर ठेवले पाहिजे. या सरकारला जर तुम्ही झुकवले नाही तर हे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत. अरबी सुमद्रात शिवाजी महाराजांचे मोठे स्मारक उभारले जात आहे, या दोन वर्षांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्या स्मारकारबद्दल किती बैठका घेतल्या हे जरा मराठा समजाच्या लोकांना त्यांनी सांगावे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
तर ५९ वा मोर्चा तुम्ही काढण्याची वेळ आणली आहे
मराठा समजाने भूमिका घ्यावी, ५८ मोर्चे तुम्ही काढले असतील तर ५९ वा मोर्चा तुम्ही काढण्याची वेळ आणलेली आहे. एवढे आवाहन मराठा समाजाचा तरूण, तरूणींना आणि समजाला करतो की, जर आपण आवाज उचलला नाही. तर आपले भविष्य निश्चितच अंधारामध्ये येईल, असे सांगत यांना आर्यन खानची किती चिंता आहे ना, पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही. देशमुखाच्या मुलीची चिंता नाही, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी यावेळी केली.
दरम्यान, हे सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी स्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते. ठाकरे सरकारने केलेल्या गंभीर चुका आणि बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. नंतर ते रद्द केले. या सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्यायाधीश भोसले समितीने केलेल्या शिफारशींनुसार पावले टाकलेली नाहीत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी यापूर्वी केली होती.