मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेली कारवाई आणि नंतर त्यांना झालेली अटक यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या कारवाईवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. त्यातच सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्या बचावासाठी शिवसेना पुढे आल्याने भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच टीकेचे लक्ष्य केले आहे.
नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात शिवसेनेकडून येत असलेल्या प्रतिक्रियांवर टीका करणारे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. त्यात नितेश राणे म्हणतात की, १९९३ च्या दंगलीनंतर मुंबई मा.बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवली. आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना ९३च्या दंगलीतील आरोपींना वाचवत आहे. म्हणून आता भगव्याची जबाबदारी आमची!, असे विधान नितेश राणे यांनी या ट्विटमधून केले आहे.
दरम्यान, नितेश राणेंनी नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. जनाब संजय राऊत आमच्या मुंबईत १९९३ मध्ये झालेली साखळी बॉम्बस्फोटांची मालिका आपण सत्तेसाठी मुजरा करण्याच्या नादात विसरलेले दिसताहेत. या हल्ल्यात २५७ मुंबईकरांनी आपले प्राण गमावले होते आणि ७१३ मुंबईकर जबर जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये दाऊद इब्राहीम सहभागी होता. हे तुमचे काँग्रेस सरकार सत्तेत असतानाच सिद्ध झाले होते. अशा देशद्रोह्यांसोबत भागिदारीचा आरोप नवाब मलिकांवर आहे. त्याचा सखोल तपास झाला पाहिजे, ही मागणी न करता तुम्ही मलिकांचा बचाव करण्यातच धन्यता मानत आहात. ही एक प्रकारची भारतमातेसोबत गद्दारी आहे. आता या पुढे आपण मुबंईला ‘आपली मुंबई’ म्हणू नका. कारण सत्तेसाठी आपण सगळं विसरलात, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता.