मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुंबईतील मेळाव्यामधून राज्यातील राजकीय घडामोडींचा आणि विरोधकांचा घणाघाती भाषेत समाचार घेतला होता. आपल्या आक्रमक शैलीत त्यांनी शिंदे गट, भाजपा आणि अमित शाहा यांना टार्गेट केले होते. मात्र यादरम्यान, शिवजयंती आणि महाराष्ट्र दिनाचा उल्लेख करताना उद्धव ठाकरेंचा गोंधळ उडाला होता. त्यांच्या भाषणातील हा भाग सोशल मीडियावर व्हायरल करून आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणातील चुकीचा हा व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणे यांनी आक्रमक भाषेचा वापर केला आहे. यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पूजा करायची? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
काल रात्री शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणादरम्यान त्यांनी शिवजयंतीच्या तारखेचा चुकीचा उल्लेख केला होता. एक मे रोजी शिवजयंतीच्यावेळी पुतळ्याचं अनावरण केलं होतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरून ते विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.