मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरण ही हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरुन राज्याच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ पाहायला मिळाली. मयत मुलीच्या कुटुंबीयांन राणे पिता-पुत्रांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयात त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर, आता विधिमंडळ अधिवेशनात पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी दिशा सालीयन प्रकरणावरुन भाष्य केलं आहे. तसेच, नितेश यांनी विधानसभेत पेन ड्राईव्हही सादर केला.
दिशा सालियनची आत्महत्या नव्हे हत्याच झाली याचा पुरावा आहे. आपण, लवकरच कोर्टाच्या माध्यमातून CBI कडे Pen drive देणार असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर केल्यानंतर भाजप आमदारही आता आक्रमक झाले आहेत. आपल्या साहेबांनी 2 पेन ड्राईव्ह काढले, मग शिष्याने एक तरी पेन ड्राईव्ह काढला पाहिजे. म्हणून, मी मुद्दामहून एक पेन ड्राईव्ह तयार करुन आणला आहे. सवालाचा पेन ड्राईव्ह आहे अध्यक्षमहोदय, असे म्हणत नितेश राणेंनी सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवला.
राजकीय हस्तक्षेप, न्यायालयाने नोंदवले मत
दिशा सालियान प्रकरणात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात राजकीय हस्तक्षेप करण्यात आल्याचे मानत दिंडोशी न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. पोलीस व अन्य तपास यंत्रणांनी सरकारचे साधन म्हणून काम करणे अपेक्षित नाही. त्यांनी योग्य व निष्पक्षपणे तपास करणे अपेक्षित आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. उपरोक्त प्रकरणी सरकारच्या हस्तक्षेपाची शक्यता आहे, असे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. एस. यू. बघेले यांनी सांगत नारायण राणे व नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.