Nitesh Rane: रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत मुंबई पोलीस आयुक्त?, राणेंचा गृहमंत्र्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:55 AM2022-04-18T11:55:23+5:302022-04-18T12:28:07+5:30
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सहभाग घेतला होता
मुंबई - राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदींवरील भोंगे उतरविण्याच्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. तर, समाजात दूरी निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. सध्या, रमजानचा महिना सुरू असल्याने मुस्लीम बांधवांकडून इफ्तार पार्ट्यांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये, अनेकजण सहभागी होत आहे. यातील मुंबई पोलीस आयुक्तांच्या सहभागावरुन आमदार नितेश राणेंनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सहभाग घेतला होता. त्यावरुन, नितेश राणेंनी गृहमंत्र्यांना सवाल केला आहे. या इफ्तार पार्टीचा फोटो शेअर करत राणेंनी महाविकास आघाडी सरकावर प्रहार केला आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते. रझा अकादमी तीच आहे, ज्यांनी आझाद मैदानावरील अमर जवान स्तंभाची मोडतोड केली होती. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. याच अकादमीने भिवंडीत मोर्चा काढल्यानंतर 2 पोलीस त्यात मारले गेले होते. नुकतेच, अमरावती, नांदेड, मालेगाव येथे जे मोर्चे काढण्यात आले, तेथेही पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली होती. जर, अशा रझा अकादमीसोबत पोलीस आयुक्त दिसत असतील तर कसं?, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) April 18, 2022
तसेच, गृहमंत्री विधानसभेत म्हणतात की, रझा अकादमीवर बंदी घालण्याचा विचार आम्ही करत आहोत. मग, त्यांचे पोलीस आयुक्त रझा अकादमीच्या लोकांसोबत काय करत आहेत?, असेही राणे यांनी ट्विटवर व्हिडिओ शेअर करत विचारले आहे.
ज्या ‘रझा अकादमीने’आझादमैदानात अमर जवान मुर्ती तोडली व महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केले अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करणे हे महाविकास आघाडीचं धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का?@OfficeofUT@BJP4Maharashtrapic.twitter.com/8IQDhvmwBJ— nitesh rane (@NiteshNRane) April 18, 2022
फडणवीसांनी केली होती बंदी घालण्याची मागणी
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. अमरावती हिंसाचार प्रकरणी देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशीस संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील महाविकासाघाडी सरकारने रझा अकादमी या संघटनेवर बंदी घालण्याची हिंमत दाखवावी असे म्हटले होते.