Nitesh Rane: “बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट”: नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 11:24 AM2022-03-07T11:24:32+5:302022-03-07T11:25:52+5:30
Nitesh Rane: हिंदुह्रदयसम्राट यावरून नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले असून, आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणखीनच वाढताना दिसत आहेत. दिशा सालियान प्रकरणी पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदुहृदयसम्राट ही पदवी कुणाला द्यायची असेल, तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, असे स्तुतिसुमने नितेश राणे यांनी भरसभेत उधळली आहेत.
भाजपकडून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर अणुशक्तीनगर विधानसभा वॉर्डमध्ये कार्यकर्ते संमेलन आयोजित करण्यात आले होते. नितेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला.
देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट
दाऊदशी संबंध आल्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा आम्ही मागत आहोत. दाऊदला मदत करणाऱ्या नवाब मलिक यांचे कॅबिनेटपद अजूनही कायम आहे. त्यांना पाठीशी घालत आहात, तर मग मुलांना रस्त्यावर काय सुरक्षा द्याल, अशी विचारणा करत, खरे म्हटले तर आपण काही जण हिंदुह्रदयसम्राट असल्याचे बॅनरसहित फोटो लावतात. पण तुम्ही माझी भावना विचारली, तर 'हिंदुहृदयसम्राट' ही पदवी बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांना द्यायला हवी, कारण त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे दाऊद कनेक्शन समोर आले आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी असे प्रश्न उपस्थित करुन हिंदुह्रदयसम्राट यावरुन आता शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे हिंदुह्रदयसम्राटचा वाद विकोपाला जाणार का, शिवसेनेकडून याला कसे प्रत्युत्तर दिले जाईल, हे आता येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल.