Join us  

मोठी बातमी! दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 2:47 PM

महाविकास आघाडी सरकार काळात दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू संशयास्पद असल्यांचा आरोप करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकार काळात दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू संशयास्पद असल्यांचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजपाचे आमदार नितेश राणे यांची होणार आहे, मुंबईपोलिस या प्रकरणी चौकशी करणार आहेत. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा आमदार राणे यांनी केला होता. 

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केली होती. सालियन यांच्या हत्येप्रकरणातील आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही आमदार राणे यांनी केला होता. दरम्यान, आता या प्रकरणी चौकशी होणार आहे. मुंबईपोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी हजेरी राहण्याची नोटीस बजावली आहे.  

'दिवा विझताना जास्त फडफडतो, तशी महायुती सरकारची अवस्था'; जयंत पाटलांचा टोला

नेमकं प्रकरण काय?

दिशा सालियान या अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या व्यवस्थापक होत्या. ८ जून २०२० रोजी मुंबईतील घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशा सालियान हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मृत्यूपूर्वी दिशाने आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती. कामाचा लोड जास्त असल्याचे तिने आपल्या मैत्रिणीला सांगितले होते. त्यानंतर थोड्याचवेळात तिचा होणारा नवरा रोहन याने दिशा ज्या खोलीत राहात होती त्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती. त्याने खिडकीतून खाली पाहिले असता दिशा पडलेली दिसली.

या प्रकरणाचा तपास सीबीआय देखील करत आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आले. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असे सीबीआय तपासात समोर आले आहे. दरम्यान दिशा सालियान प्रकरणात राजकीय वर्तुळातूनही अनेक आरोप करण्यात आले आहेत. 

टॅग्स :नीतेश राणे मुंबईपोलिस