‘देवा’ला मारुन टायगर जिंदा राहत असेल, तर थिएटर्सना कुठलाच टायगर वाचवू शकणार नाही'- नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 08:14 AM2017-12-20T08:14:04+5:302017-12-20T11:38:38+5:30
मनसेनंतर आता नितेश राणे यांनी सिनेमाला समर्थन दाखविलं आहे.
मुंबई- येत्या शुक्रवारी सलमान खान, कतरिनाचा 'टायगर जिंदा है' आणि अंकुश चौधरीचा 'देवा' सिनेमा रिलीज होत आहे. पण देवा सिनेमाला सिनेमागृह मिळत नसल्याचं समोर आलं आहे. देवा सिनेमाला थिएटरर्स मिळत नसल्याने निर्मात्यांनी मनसेकडे धाव घेतली होती. मनसेनंतर आता नितेश राणे यांनी सिनेमाला समर्थन दाखविलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे, असं आमदार नितेश राणे यांनी म्हंटलं आहे.
“महाराष्ट्रामध्ये ‘देवा’ला मारुन ‘टायगर’ जिवंत राहत असेल तर त्या थिएटर्सना कुठलाच ‘टायगर’ वाचवू शकणार नाही”, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
महाराष्ट्र मध्ये ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहत असेल तर ते थियटरस ना कुठलाच टायगर वाचु शकणार नाही!!
— nitesh rane (@NiteshNRane) December 19, 2017
महाराष्ट्र मध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे!!
टायगर जिंदा है या हिंदी सिनेमामुळे देवा या सिनेमाला थिएटर्स मिळत नसल्याने मराठी सिनेमांना थिएटर्स तसंच प्राइम टाइम मिळत नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता. 'देवा' सिनेमाला आपल्या सिनेगृहात प्राईम टाईममध्ये खेळ द्या अशी विनंती केली. सोबतच तुटेल एवढे ताणू नका असा इशाराही दिला आहे.
काय लिहिलं आहे अमेय खोपकर यांच्या फेसबूक पोस्टमध्ये -
प्रती,
व्यवस्थापक
आपण आपले चित्रपटगृह महाराष्ट्राच्या भूमीत चालवता ह्याचा आपल्याला विसर पडला असावा म्हणून हे स्मरणपत्र. हे लिहिताना आम्ही आमच्या भावनांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु त्या आपल्या एका कृतीमुळे अतिशय दुखावल्या गेल्या आहेत.
दिनांक २२ डिसेंबर रोजी इनोव्हेटिव्ह फिल्म्सचा “देवा” हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्याचा अथक प्रयत्न चालू आहे. पण “चित्रपटगृह उपलब्ध नाही” असे ठोकळेबाज उत्तर त्याला प्रत्येक ठिकाणी मिळत आहे. कारण का ? तर त्या दिवशी “टायगर जिंदा है” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्या हिंदी निर्मात्याने आपल्या नावाचा, बळाचा धाक दाखवून सर्वच्या सर्व चित्रपटगृहांवर कब्जा केला आहे. पण मग बाकी निर्मात्यांनी काय करायचे ? कुठे जायचे ? ही अशी मोनॉपोली जर हिंदी निर्माते करणार असतील तर मराठी निर्मात्यांनी काय करायचे ? दुसऱ्या कुठल्या गैरहिंदी राज्यात ही अशी दादागिरी सहन केली जाईल ? एकदा दक्षिणेच्या कुठल्याही राज्यात असे धाडस करून बघा. पार्श्वभागावर लाथ मारून बाहेर काढतील, हाकलून देतील, मग ह्या महाराष्ट्रातच मराठीची ही गळचेपी का होते आहे ? ह्याला जबादार असणाऱ्या अनेक घटकांपैकी तुम्ही एक आहात हे ध्यानात घ्या. येणाऱ्या सर्व चित्रपटांना संधी देणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत.सर्वभाषिक प्रेक्षकांना आणि विशेषतः मराठी प्रेक्षकांना अग्रक्रमाने सेवा देण्यासाठी तुम्ही आहात. तुम्ही म्हणाल की हा आमचा प्रश्न आहे, आम्ही हवे ते करू. तर मग नीट ऐका. महाराष्ट्राची अस्मिता जपणे आणि मराठी चित्रपटांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा आमचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी जे हवे ते आम्ही करू. आम्ही समंजस आहोत, सहनशील आहोत म्हणजे आम्ही दुर्बल आहोत असा गैरसमज तुम्ही करून घेतला असेल तर तो दुर्दैवी आहे. कदाचित साहेबाच्या भाषेत सांगितले तर तुम्हाला जास्त पटेल - Live and let live . स्वतः जागा आणि दुसऱ्याला जगू द्या. त्यात दोघांचेही हित आहे. आणि ह्या दोन्ही भाषा तुम्हाला समजत नसतील तर मग आम्हाला आमच्या “खास” भाषेत तुम्हाला समजावून सांगायला लागेल. तेव्हा तुटेल एवढे ताणू नका.
आमची नम्र विनंती आहे की २२ डिसेम्बरला इनोव्हेटिव्ह फिल्म्सच्या “देवा” ह्या मराठी चित्रपटाला आपल्या चित्रपटगृहात प्राईम टाईममध्ये खेळ द्या.
आपला नम्र
अमेय विनोद खोपकर
अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना