मुंबई : मुंबई पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभित झाली पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. पण पर्यावरण मंत्र्यांच्या हट्टापायी पैशाचा गैरवापर होत असेल, नियम धाब्यावर बसवत असतील तर त्याला आमचा विरोध असणार आहे, असे म्हणत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी गिरगाव चौपाटीवरील व्हिविंग गॅलरीला विरोध केला आहे.
गिरगाव चौपाटीवर उभारलेली व्हिविंग गॅलरी ही पर्जन्य जलवाहिणीवर उभारण्यात आलेली आहे. समुद्रात पिलरदेखील टाकलेले आहेत. सीआरझेडचे नियम देखील पाळलेले नाहीत. पर्यटनाच्या नावाखाली अधिकारी आणि प्रशासनाला हाताशी धरून जनतेच्या पैशाचा चुराडा केला आहे. यामुळे पालिका आयुक्तांनी एमआरटीपी ऍक्ट प्रमाणे कारवाई करावी अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
यावर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये नितेश राणे म्हणतात, दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेच्या वतीने नवीन प्रेक्षक गॅलरी (Viewing Gallery) उभारण्याचे काम सुरू आहे. या गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन्य जलवाहिनीच्यावर सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्यात येत आहे. सदर पक्के बांधकाम कुठलेही CRZ नियमांतर्गत परवानगी न घेता समुद्रातून पिलर्स बांधून केले गेले आहे. त्यामुळे समुद्रातील जैवविविधतेला नुकसान झाले आहे. आणि भविष्यात त्यामुळेच ग्रीन ट्रॅब्युनलकडून (NGT) दंडपण आकारला जाईल. यावर कारवाई करावी, अन्यथा MRTP ACT कलम 56 (A) अंतर्गत संबधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई संबंधी न्यायलयात दाद मागावी लागेल, असा इशारा दिला आहे.