Join us

नितेश राणेंनी मांडली मनसेची बाजू, पक्षाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 6:17 PM

काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मात्र मनसेची बाजू मांडत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. नितेश राणे यांनी ट्विट केलं असून काँग्रेसच्या भुमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मात्र मनसेची बाजू मांडत पक्षाला घरचा आहेर दिला आहेनितेश राणे यांनी ट्विट केलं असून काँग्रेसच्या भुमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं'महात्मा गांधींच्या मार्गाचा अवलंब करणा-या काँग्रेसने उत्तर देताना अहिंसा करणं कितपत योग्य आहे ?'

मुंबई - मनसेने काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मुंबईत काँग्रेस विरुद्ध मनसे संघर्ष पेटला आहे. आरोप - प्रत्यारोपाला सुरुवात झाली असून काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मात्र मनसेची बाजू मांडत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. नितेश राणे यांनी ट्विट केलं असून काँग्रेसच्या भुमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नितेश राणेंनी ट्विट केलं आहे की, 'मनसेने नक्कीच चुकीचं केलं आहे. पण महात्मा गांधींच्या मार्गाचा अवलंब करणा-या काँग्रेसने उत्तर देताना अहिंसा करणं कितपत योग्य आहे ? मनसेविरोधात निषेध करताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांगड्या दाखवणं कितपत योग्य आहे ? हा महिलांचा अपमान नाही का ? नैतिकता आणि विचारप्रणाली ?'.

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटीएम येथील कार्यालयावर सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.  सुरुवातीला हा हल्ला नेमका कोणी केला याबद्दल स्पष्टता नव्हती. पण हल्ला झाल्यानंतर काहीवेळाने मनसेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मनसे नेता संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन  हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक. इट का जवाब पथ्थर से मिलेगा.. असे टि्वट त्यांनी केले. दरम्यान पोलिसांनी कारवाई करत संदिप देशपांडे यांच्यासह सात ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

मनसेच्या हल्ल्याचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्ते ठिकठिकाणी निदर्शन करत आहेत. यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज ठाकरे बांगड्या घाला, अशा घोषणा देत निषेध केला.  इंग्रजांना घाबरलो नाही, तर मनसेच्या भेकडांना घाबरण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची प्रतिक्रिया यूथ प्रदेशचे उपाध्यक्ष सूरज सिंग ठाकुर यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली नाही, तर त्यांनाही यूथ काँग्रेस बांगड्या भेट देईल, असा इशाराही ठाकुर यांनी दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी करारा जवाब मिलेगा असं म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून संजय निरुपम यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 'मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष मुख्यालयाची तोडफोड केली. पोलीस स्टेशन फक्त 25 मीटर अंतरावर आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर चोख उत्तर देण्यात येईल', असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे. संजय निरुपम सध्या गुजरातमध्ये आहेत.

'कार्यकर्त्यांना रोज फेरीवाल्यांकडून मार खावा लागत असल्याने मी मनसेची निराशा समजू शकतो. त्यांनी आमच्या कार्यालयावर केलेला हल्ला भ्याड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा चोख प्रत्युत्तर देण्यात येईल', असं संजय निरुपमांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :नीतेश राणे मनसेकाँग्रेस