Join us

आता 'बेस्ट' खाऊन दाखवतो, नितेश राणेंची व्यंगचित्रातून शिवसेनेवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 8:50 AM

मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपाचा आज सातवा दिवस सुरू आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यात अद्याप सत्ताधारी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना यश आले नाही.

मुंबई - स्वाभिमान पक्षाचे नेते आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी चक्क व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपाचा आज सातवा दिवस असूनही अद्याप यावर तोडगा निघाला नाही. त्यावरुन, नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. तर, ज्याप्रमाणे मुंबईतील गिरण्या, खंटाबा यांच्या जागा खाल्ल्या, त्याचप्रमाणे बेस्ट दाखवतो, असे उद्धव ठाकेर म्हणत असल्याचा टोलाही राणेंनी लगावला आहे.

मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपाचा आज सातवा दिवस सुरू आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यात अद्याप सत्ताधारी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना यश आले नाही. उद्धव ठाकरे आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बेस्ट कामगार नेत्यांशी तब्बल 7 तास चर्चा करुनही बेस्टचा संप मिटवता आला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. त्यातच, आता ठाकरेंचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. नितेश राणेंनी थेट राज ठाकरेंप्रमाणे एका व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेची बेस्टबद्दली भूमिका स्पष्ट केली आहे. 

या व्यंगचित्रात एका बाजुला आदित्य ठाकरे दिसत असून दुसऱ्या बाजुला उद्धव ठाकरे दिसत आहेत. तर, दोघांमध्ये बेस्टचा कामगार दिसून येतो. या कामगाराच्या हातात बस दाखविण्यात आली असून उद्धव ठाकरेंपासून ही बस वाचविण्यात येत आहे. कारण, उद्धव ठाकरेंनी गिरणी कामगारांच्या जागा हडप केल्या, खंबाटा एव्हीएशन या विमान वाहतूक कंपनीतील कामगारांनाही देशोधडीला लावले. आता, बेस्ट कामगारांनाही देशोधडीला लावून बेस्टच्या जागा हडप करण्याचा डाव असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप न मिटल्यानं मुंबईकरांचे हाल सुरुच आहेत. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीबरोबर चर्चा झाल्यानंतरही लेखी आश्वासन मिळेपर्यंत बेस्ट कामगार संघटना माघार घेण्यास तयार नाहीत. आज मुंबई उच्च न्यायालयात संपासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी असल्यानं तोवर राज्य सरकार कोणता निर्णय घेतं, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बेस्ट कामगार कृती समिती, बेस्ट प्रशासन आणि राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीची दुसरी फेरीही सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातव्या दिवशी तरी बेस्टच्या कामगारांचा संप मिटेल का, याकडे मुंबईकरांच्या नजरा लागल्या आहेत.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनानीतेश राणे बेस्ट