मुंबई - नवाब मलिक यांच्या ईडीकडून सुरू झालेल्या चौकशीमुळे राज्यातील राजकारणामध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईविरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. तसेच सत्य बोलताहेत त्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जात आहे, असा दावा केला होता. मात्र आता त्यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
नितेश राणे म्हणाले की, जनाब संजय राऊत आमच्या मुंबईत १९९३ मध्ये झालेली साखळी बॉम्बस्फोटांची मालिका आपण सत्तेसाठी मुजरा करण्याच्या नादात विसरलेले दिसताहेत. या हल्ल्यात २५७ मुंबईकरांनी आपले प्राण गमावले होते आणि ७१३ मुंबईकर जबर जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये दाऊद इब्राहीम सहभागी होता. हे तुमचे काँग्रेस सरकार सत्तेत असतानाच सिद्ध झाले होते. अशा देशद्रोह्यांसोबत भागिदारीचा आरोप नवाब मलिकांवर आहे. त्याचा सखोल तपास झाला पाहिजे, ही मागणी न करता तुम्ही मलिकांचा बचाव करण्यातच धन्यता मानत आहात. ही एक प्रकारची भारतमातेसोबत गद्दारी आहे. आता या पुढे आपण मुबंईला ‘आपली मुंबई’ म्हणू नका. कारण सत्तेसाठी आपण सगळं विसरलात, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
दरम्यान, नवाब मालिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईविरोधात संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. संजय राऊत म्हणाले होते की, नवाब मलिक किंवा आम्ही सातत्याने बोलतोय, सत्य बोलतोय त्यांच्यामागे ईडी सीबीआय मागे लावले जातेय. चौकशी होईल आणि संध्याकाळी घरी येतील. माझे सर्वांशी बोलणे झाले. चौकशी होऊ शकते. राज्याच्या एक मंत्र्यांला ईडी चौकशीसाठी बौलावले जाते. किरीट सोमय्यांनी ईडीकडे हे प्रकरण दिलं आहे. भाजपा नेत्यांची आम्ही सगळी प्रकरणे ईडीकडे देणार आहोत. भाजपा व्यतिरिक्त सर्व पक्षासाठी ईडी आहे का? असा सवाल त्यांनी विचारला होता.
तसेच जे सत्य बोलतात किंवा भाजपचे जिथे सरकार नाहीय तिथे ईडीच्या तपास यंत्रणा लावल्या जातात. माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले. २०२४ नंतर चित्र वेगळे असेल. मलिक कॅबिनेट मंत्री आहेत. मलिक सत्य बोलत आहेत, त्यांना चौकशीसाठी नेले आहे, हे महाराष्ट्र सरकारसमोर आव्हान आहे. २०२४ नंतर आम्ही सुद्धा तुमच्या मागे अशा तपास यंत्रणा लावू असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला होता.