नितेश राणेंची संघ कार्यक्रमातील बैठक, नारायण राणेंचं 'हे' स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 10:37 AM2019-10-09T10:37:53+5:302019-10-09T10:46:19+5:30
नितेश राणेंच्या संघ परिवारातील कार्यक्रमाच्या फोटोची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली.
सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून नितेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपा जिल्हा अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत नितेश राणेंनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मही देण्यात आला. विशेष म्हणजे भाजपा प्रवेशानंतर सोशल मीडियावर नितेश राणेंचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत ते संघाच्या कार्यक्रमाला हजर असून जमिनीवर बसलेले पाहायला मिळत आहेत.
नितेश राणेंच्या संघ परिवारातील कार्यक्रमाच्या फोटोची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली. अनेकांनी नितेश यांना ट्रोल करायला सुरुवात केली. या फोटोत नितेश राणे संघाच्या कार्यक्रमाला हजर असून गणवेश नसल्यामुळे वेगळ्याच रांगते बसल्याचे पाहायला मिळत आहे. नितेश राणेंच्या या संघबैठकीचं वडिल नारायणे राणेंनी समर्थन केलं आहे. तसेच, मीही संघाच्या कार्यक्रमाला जाईल, त्यात गैर काय? असेही स्पष्टीकरण राणेंनी दिलंय.
''संघाच्या कार्यक्रमात जाणं यात चुकीचं काय. संघात जाणं चुकीचं नाही, मीही संघात जाईन, संघाच्या प्रमुखांना भेटेन. जायचंच तर मनापासून जायचं असं म्हणत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नितेश राणेंच्या संघ कार्यक्रमातील बैठकीचं समर्थन केलं आहे. माझी विचारधारा ही हिंदुत्ववादीच आहे. काँग्रेसमध्ये जाणं हा माझा नाईलाज होता,'' असेही स्पष्टीकरण राणेंनी दिले. भारतीय जनता पक्षाची विचारधारा मी मान्य केलीय आणि संघाची विचारधाराही मी मान्य करतो, असे म्हणत संघाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिल, असेही राणेंनी म्हटले आहे.
दरम्यान, कणकवली विधानसभा मतदारसंघातून संदेश पारकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून शिवसेना नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. यासाठी खासदार विनायक राऊत यांच्यासह खुद्द शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी त्यांच्या घरी ठाण मांडले होते. संदेश पारकर यांना शिवसेनेत बड्या पदावर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे अखेर पारकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता कणकवलीत नारायणे राणे विरुद्ध सतीश सावंत असाच सामना रंगणार आहे.