मुंबई : जानेवारी महिन्यात मिरा रोड हिंसाचारात द्वेषपूर्ण भाषण केल्याबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे, गीता जैन आणि तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ८ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.
या तिन्ही नेत्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयात याचिका दाखल करावी, असे या घटनेतील दोन पीडित आणि अन्य पाच रहिवाशांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. २१ जानेवारी २०२४ रोजी मिरा रोडमधील अल्पसंख्याक वस्तीत हिंसाचार घडला आणि त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले. हा हिंसाचार सुरू असतानाच नितेश राणे व गीता जैन यांनी अल्पसंख्याकांना त्यांच्या भाषणातून धमकी दिली. त्याशिवाय टी. राजा यांनीही २५ फेब्रुवारी रोजी मिरा रोडमध्ये काढलेल्या रॅलीत जातीय टिपण्णी केली, असे याचिकेत म्हटले आहे. राणे गोवंडी, मालवणी या ठिकाणीही गेले आणि तिथेही द्वेषपूर्ण भाषण केले. स्थानिकांनी तिन्ही आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांना विनंती केली. मात्र, त्यांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, द्वेषपूर्ण भाषणाची दखल घेऊन स्वत:हून गुन्हा दाखल करण्यात मुंबई पोलिस अपयशी ठरले आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.