Join us

कोण आहेत रशेश शाह? नितीन चंद्रकांत देसाईंच्या केसमध्ये जोडलं जातंय नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 3:17 PM

नितीन देसाईंनी कर्ज घेतलेल्या एडलव्हाईस कंपनीचा रशेश शाहशी संबंध काय? जाणून घ्या

Nitin Desai Death Case, Rashesh Shah: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल उचललं. एनडी स्टुडिओ या आपल्या स्वत: उभारलेल्या स्टुडिओमध्ये त्यांनी आपले जीवन संपवले. नितीन देसाई यांच्यावर सुमारे २५० कोटींचे कर्ज होते. त्या कर्जाची परतफेड करण्यात त्यांना अडचणी येत असल्याने त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. हे कर्ज एडलव्हाईस कंपनीकडून देण्यात आले होते, आणि कर्जाची परतफेड होत नसल्याने स्टुडिओवर जप्ती आणण्याची कारवाई करू द्यावी, अशी मागणी या कंपनीने केली होती. या प्रकरणात आर्थिक फसवणूक झाली आहे का, असा एक अंदाज आता व्यक्त केला जात असून त्यात रशेस शाह यांचे नाव जोडले जात आहे.

रशेश शाह यांचा संबंध काय?

भाजपाचे आशिष शेलार यांनी आज विधिमंडळात औचित्याच्या मुद्याद्वारे नितीन देसाई यांचा विषय उपस्थित केला. नितीन चंद्रकांत देसाई यांनी एनडी स्टुडिओवर १८० कोटींचे कर्ज काढले होते. या १८० कोटींचे २५२ कोटी झाले. या प्रकरणातून रशेस शाह नामक व्यक्ती आणि ‘एआरसी एडेलव्हाइस’ कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, असे आशिष शेलार म्हणाले. नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात एडलव्हाईस कंपनी आणि त्या कंपनीचे संचालक रशेश शाह यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. रशेश शाह नेमके कोण हे जाणून घेऊया.

कोण आहेत रशेश शाह?

सध्या ५७ वर्षांचे असलेले रशेश शाह हे IIM अहमदाबादचे विद्यार्थी आहेत. त्यांनी १९८९ साली शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला ते ICICI मध्ये कार्यरत होते. प्रतिष्ठेच्या वरच्या पदावर असताना १९९५ साली त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी ICICI मधील सहकारी व्यंकट रामास्वामी यांच्याशी भागीदारी करून एडलवाईस (Edelweiss) कंपनी स्थापली. एडलव्हाईस कंपनीकडून क्रेडिट, विमा आणि आर्थिक सेवा पुरवल्या जातात. सुरूवातीला रशेश शाह यांच्याकडे फक्त २० लाख रुपयांचे भांडवल होते असे सांगितले जाते. २० लाख रुपयांपासून रसेश शाह यांनी गेल्या २७ वर्षांमध्ये हजारो कोटींची उलाढाल असणारी कंपनी उभारली. एडलव्हाईसचे पहिले ऑफिस ५०० चौरस फुटांचे होते. मित्र व्यंकट व इतर तीन जणांना सोबत घेऊन त्यांनी ही कंपनी सुरू केली होती. मुंबईच्या नरीमन पॉइंट भागात हे कार्यालय होते. पण सध्या मात्र मुंबईच्या सांताक्रूझ भागात एडलवाईस हाऊस या इमारतीचे आलिशान असे कार्यालय आहे.

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईसेलिब्रिटी