Join us

नितीन दातार पुन्हा बनले थिएटर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष

By संजय घावरे | Published: September 15, 2023 9:21 PM

'सरकारने एकेरी सिनेमागृहांच्या हितासाठी योजना राबवावी'

मुंबई - सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नितीन दातार पुन्हा बिनविरोध निवडून आले आहेत. ग्रँट रोड येथील असोसिएशनच्या कार्यालयात पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षांसह इतर पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात आली.

दर दोन वर्षांनी सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक होते. दातार मागील सात वर्षांपासून असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहात असून, सलग चौथ्यांदा ते अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. उपाध्यक्ष तेजस करंदीकर आणि शरद दोशी, खजिनदार विधानी आर. व्ही. आणि निमिष सोमय्या, सरचिटणीस कुणाल मोहोळ आणि विराफ वत्चा, तत्कालीन माजी अध्यक्ष दीपक कुडाळे अशी निवडून आलेल्या इतर पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर 'लोकमत'शी बोलताना दातार म्हणाले की, बंद पडलेली सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच नवीन थिएटर्स उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

नवीन थिएटर्स उभारली गेली तर निर्मात्यांचा बिझनेस वाढेल. लोकांच्या हाताला काम मिळेल. केवळ फिल्मसिटी आणि स्टुडिओजला सरकारने पैसे देण्याऐवजी सिनेमागृहांनाही मदत करायला हवी. सरकारने एखादी अशी योजना राबवावी जेणेकरून सरकारी तिजोरीवरही अतिरीक्त भार पडणार नाही आणि थिएटर मालकांनाही प्रोत्साहन मिळेल असेही दातार म्हणाले.