'नितीन कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा, या घटनेचा छडा लागायला हवा'; राज ठाकरेंचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 03:26 PM2023-08-02T15:26:52+5:302023-08-02T15:37:39+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओतच आपलं जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास केला जात आहे.
नितीन देसाई यांचा जन्म दापोली येथे झाला. त्यांनी मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालयातून प्रशिक्षण घेतले. तर 1987 पासून त्यांनी कलाविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली. 1993 साली आलेल्या अधिकारी ब्रदर्सच्या 'भूकंप' सिनेमातून त्यांनी सुरुवात केली. मात्र 1994 साली आलेल्या '1942 अ लव्ह स्टोरी' या सिनेमामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. आज 2 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याने हा कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे. असो, कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा, असं म्हणत राज ठाकरे यांनी नितीन देसाईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस… pic.twitter.com/tJjqeXeH4q
— Raj Thackeray (@RajThackeray) August 2, 2023
नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. 2005 साली हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असा भव्य 'एनडी स्टुडिओ' त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं. 'परिंदा', 'डॉन', 'लगान', 'देवदास', 'जोधा अकबर', 'हम दिल दे चुके नम' अशा अनेक भव्य सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं. तर 'बालगंधर्व' सारख्या मराठी सिनेमाचंही कलादिग्दर्शन केले. 'देवदास','खामोशी' या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.