नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधील पहिलं वाक्य ऐकून सर्वांना बसला धक्का; "लालबागच्या..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 09:38 AM2023-08-03T09:38:48+5:302023-08-03T09:51:59+5:30
नितीन देसाईंनी स्व:कष्टाने आणि मेहनतीने उभारलेल्या एनडी फिल्म स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केली.
मुंबई: भव्यदिव्य कलाकृतींनी रुपेरी पडद्यावर अमीट ठसा उमटवणारे प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (५७) यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या या मृत्यूनं संपूर्ण सिनेमासृष्टी हळहळली आहे.
पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कलिना फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना पंचनाम्यावेळी बोलवण्यात आले. तसेच डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञही उपस्थित होते. जे जे रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. एनडी स्टुडिओतच उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते. देसाई यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, २ मुली, जावई असा परिवार आहे.
नितीन देसाईंनी स्व:कष्टाने आणि मेहनतीने उभारलेल्या एनडी फिल्म स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केली. देसाईंना आर्थिक चणचण भासत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ११ ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या. हा रेकॉर्डर बहिणीकडे सोपवावा असे देखील कर्मचाऱ्याला सांगितले. सकाळी आठ वाजेपर्यंत कर्मचाऱ्याला कोणतीही हालचाल दिसली नाही. त्याने पहिल्यांदा व्हॉईस रेकॉर्डिंग ऐकली आणि पहिल्या ऑडिओ क्लिपचे पहिले वाक्य ऐकून त्याला धक्काच बसला. लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार असे पहिल्या ऑडिओ क्लिपमधील पहिले वाक्य होते. हे ऐकताच कर्मचाऱ्यांने बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान, चित्रपटातील सेटसोबतच नितीन देसाई दरवर्षी मुंबईतील 'लालबाग चा राजा' गणपतीसाठी आकर्षक देखावा उभारायचे. गेल्या वर्षी त्यांनी राममंदिराचा देखावा उभारला होता. महिनाभरापूर्वीच त्यांनी लालबागच्या राजासाठी देखावा उभारण्याचे सुरू केले होते. यावर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा उभारण्याची योजना आखली होती. सुमारे ३४९ वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. नितीन देसाईंना तो सोहळा पुन्हा लोकांमसमोर आणायचा होता. यावर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा उभारण्याचे काम सुरू केले होते. पण, नितीन देसाई यांच्या अकाली जाण्याने लालबागच्या राजाच्या देखाव्याचे काम अपूरे राहिले आहे. गणपतीच्या आगमनाला अवघे ४५ दिवस उरले आहेत. अशा स्थितीत या सेटचे काम कोण आणि कसे पूर्ण होणार, हा प्रश्न ‘लालबाग चा राजा’च्या टीमसमोर आहे.
कलाविश्वातील सर्वात मोठं नाव-
नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. २००५ साली हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असा भव्य 'एनडी स्टुडिओ' त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं. 'परिंदा', 'डॉन', 'लगान', 'देवदास', 'जोधा अकबर', 'हम दिल दे चुके नम' अशा अनेक भव्य सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं. तर 'बालगंधर्व' सारख्या मराठी सिनेमाचंही कलादिग्दर्शन केले. 'देवदास','खामोशी' या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
शिंदे-फडणवीस-पवार यांना विनंती
कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून आपली आर्थिक फसवणूक आणि छळ झाल्याचे त्यांनी क्लिपमध्ये म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घावा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऑडिओ क्लिपद्वारे केली आहे. देसाई यांच्या सूचनेनुसार त्यांचे सहायक योगेश ठाकूर यांनी संबंधित ऑडिओ क्लिप ॲड. वृंदा विचारे यांना पाठविल्याचे समजते.