Join us

मंत्री म्हणून 'या' रस्त्याची लाज वाटते- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 5:53 AM

धडाक्यात योजना राबविणारे गडकरीही कधी कधी व्यवस्थेपुढे हतबल होतात.

मुंबई/उरण : नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हातखंडा आहे. मात्र, धडाक्यात योजना राबविणारे गडकरीही कधी कधी व्यवस्थेपुढे हतबल होतात. मुंबईतील पर्यटनवृद्धीसाठी आणलेली ‘अ‍ॅम्पीबियस’ बस आणि रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे गडकरी चांगलेच उद्विग्न झाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. रखडलेल्या चौपदरीकरणामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. मंत्री म्हणून मलाच त्याची लाज वाटते आहे. मात्र, हे पाप काँग्रेस आघाडी सरकारचे आहे. नव्याने कंत्राटदार नेमला असून तातडीने काम पूर्ण करण्याची तंबी दिल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)ला भेट देत विविध योजनांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी आपल्या खात्यातील विविध योजनांची माहिती दिली. या वेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाविषयी गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. या महामार्गावरील पळस्पे ते इंदापूरदरम्यानचे काम रखडले आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असून लोकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मला स्वत:ला ४ किलोमीटरचे अंतर कापायला अर्धा तास लागला. मंत्री म्हणून मला या रस्त्याची लाज वाटते. मात्र, काँग्रेस आघाडी सरकारने घातलेल्या घोळामुळे या रस्त्याचा विचका झाला आहे. हे आघाडी सरकारचे पाप आहे. पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा मार्गी लागावा यासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त केला असून त्याला वेळेत काम पूर्ण करण्याची तंबी दिली आहे. हा पहिला टप्पा वगळता मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. मार्चपर्यंत सर्व काम पूर्ण होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबईकरांसाठी समुद्रात, जमिनीवर धावू शकणारी ‘अ‍ॅम्पीबियस’ बस सुरू करण्याचे प्रयत्न झाले. पर्यटनवृद्धी आणि प्रवाशांसाठी ही बस सोयीची ठरली असती. मात्र, या बससाठी मलबार हिल परिसरात छोटी जेट्टी उभारण्यास उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पर्यावरणीय समितीने नकार दिला. या समितीच्या नकारघंटेमुळे ही बस अडगळीत पडून आहे. याबाबत विचारले असता, ‘आता ती बस आपण सगळे मिळून गेट वे आॅफ इंडियाजवळच्या समुद्रात विसर्जित करून टाकू,’ अशा शब्दांत गडकरी यांनी आपला संताप व्यक्त केला.नमामी गंगा कार्यक्रमांतर्गत गंगा नदीच्या शुद्धिकरण, सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत नागरिकांना या कामासाठी २५० कोटी निधी दिला. या कामातील जनसहभाग वाढविण्याचा आमचा मानस आहे. देशभरातील एक कोटी लोकांकडून छोट्या-मोठ्या देणग्यांच्या स्वरूपात गंगा नदीसाठी दोन हजार कोटींचा निधी उभारण्याचा मानस गडकरी यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :नितीन गडकरीमुंबईगोवारस्ते वाहतूक