मुंबई - राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप करणारं खळबळजनक पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गडकरींच्या पत्रावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर, आता शिवसेनेकडून जाहीरपणे पहिली प्रतिक्रिया आली आहे.
शिवसेना नेते आणि कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी नितीन गडकरींच्या पत्रावरुन भाजपवर पलटवार केला आहे. 'नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात एकमेकांबद्दल आदराची भावना आहे. गडकरींना असं पत्र लिहिण्याचा अधिकार आहे. हीच गोष्ट ते फोनवरुनही बोलू शकले असते. पण, मग हे माध्यमांसमोर का आलं?. शिवाय, तुम्हाला खरंच अडथळा येत आहे म्हणून मार्ग काढायचा आहे की संधी मिळेल तेथे शिवसेनेला ठोकायचं आहे?,' असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला आहे. तसेच, ज्यांनी सिंधुदुर्गामध्ये अधिकाऱ्यांच्या अंगावर चिखल ओतला ते आमदार तुमच्याच पक्षाचे आहेत. याची मला फक्त तुम्हाला आठवण करुन द्यायची आहे, असेही जाधव यांनी म्हटलं आहे. शिवसेनेकडून अद्याप नितीन गडकरींच्या पत्रावर जाहीरपणे प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, भास्कर जाधव यांच्या टीकेमुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे.
अजित पवारांनीही माडंल मत
"ठेकेदार जर चांगलं काम करत असेल आणि काही जण राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा मिळालेल्या पदाचा गैरवापर करुन कुणाला त्रास देत असतील असले प्रकार ताबडतोब थांबले पाहिजेत", असं रोखठोक मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. "मी गेल्या ३० वर्षांपासून समाजकारणात व राजकारणात काम करत असताना नेहमी सांगत आलोय की हा जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशाचा वापर चांगल्या कामासाठीच झाला पाहिजे. कामाचा दर्जा देखील चांगला राखला गेला पाहिजे. तो जर तसा राखला जात नसेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे", असंही अजित पवार म्हणाले.
नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामात स्थानिक शिवसेना लोकप्रतिनिधींकडून अडथळा आणला जात असल्याचा आरोप करत दोन पानी पत्र लिहिलं आहे. यात गडकरींनी राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे. यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे याबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
जाधवांनी यापूर्वीही राणेंवर केला होता प्रहार
'नारायणराव राणेंना मी सल्ला देऊन काही फायदा नाही. कारण त्यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत, असंच प्रत्येक आई-बाप म्हणेन. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरा-मोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात. मतमतांतर वेगळी असू शकतात पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं नाहीए. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण राणेंबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नाही,' असं भास्कर जाधव म्हटलं