लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : देशातील गरिबांना श्रीमंत करण्याच्या दृष्टीने मी एक प्रस्ताव सेबीला (भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ) दिला आहे. रस्त्यांसाठी सार्वजनिक राेखे काढून त्यात गुंतवणुकीवर सात टक्के व्याज देण्यात येईल. सध्या बँकेत सहा टक्के व्याज मिळते. शेतकरी, शेतमजूर, पोलीस कर्मचारी, कामगार यासारख्या गरीब माणसांना या रोख्यातून चांगला परतावा मिळेल. या प्रस्तावाला सेबीच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे सांगितले.
सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या दुष्काळी तालुक्यांतून नवा पुणे-बंगळुरू महामार्ग जाईल. यासाठी ४० हजार कोटींची तरतूद असून, पावसाळ्यात पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या सध्याच्या पुणे-बंगळुरू महामार्गाला तो पर्याय ठरेल, या महामार्गांवर १२० प्रतितास गतीने प्रवास करता येईल, असेही त्यांनी सांगितले. मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स आणि जव्हेरी पेढीच्या १९० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त गडकरी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.गडकरी म्हणाले, गरिबांची आर्थिक प्रगती व्हावी, हे माझे पहिल्यापासून स्वप्न आहे. मग त्यादृष्टीने विचार सुरू होता. यातूनच सार्वजनिक राेख्याची (बाँड) कल्पना सुचली आहे.
पुणे-शिरूर-वाघोली या १२ हजार कोटींच्या तीन मजली महामार्गाचे काम सुरू आहे. सर्वांत वरच्या मजल्यावर विजेवर सार्वजनिक वाहतूक चालेल. - नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री
‘सपने दिखानेवाले लोगों को अच्छे लगते है, मगर पुरे न करनेवालों की धुलाई करते है’, अशा शब्दांत गडकरी यांनी राजकीय आश्वासनांचे वास्तव सांगितले.
n राजकारण म्हणजे सत्ताकारण नव्हे. समाजकारण, विकासकारण व राष्ट्रकारण याला प्राधान्य द्यायला हवे. आज या गोष्टींचे भान बऱ्याच जणांना राहिलेले नाही.
n आजही आम्ही शरद पवारांना भेटतो. ते कधीही राजकारणाचा विषय काढत नाहीत. विकासाच्या अनेक गोष्टी ते सुचवतात. त्यामुळे विरोधक कोण आहे, सत्तेत कोण आहेत, यापेक्षा समाजासाठी काय करता येईल, याचा विचार व्हायला हवा.
n सत्ताधाऱ्यांचीच कामे करायची, विरोधकांची करायची नाहीत, हे चुकीचे आहे. योग्य असलेली कामे कोणाचीही असतील, तर ती केलीच पाहिजेत. मतदान केलेल्यांची व न केलेल्यांचीही कामे करायला हवीत. असेही नितीन गडकरी म्हणाले.