Join us  

Nitin Gadkari: नितीन गडकरींनी 'शिवतिर्थ' भेटीचं दिलं स्पष्टीकरण, सांगितलं 'राज'कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 8:18 AM

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचली.

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तसेच, नवाब मलिकांपासून ते शरद पवारांपर्यंत त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांवर प्रहार केला. तर, मिशिदींवरील भोंग्यावरुनही आक्रमक भूमिका जाहीर केली. त्यामुळे, राज यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा रंगली असून महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावरी टीका केली आहे. दुसरीकडे भाजप नेते त्यांच्या भाषणाचं समर्थन करत आहेत. त्यातच, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनीराज ठाकरेंच्या शिवतिर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचली. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण, राज यांनी आपल्या भाषणात भाजपवर एक शब्दही टीका केली नाही. याउलट शिवसेनेला टार्गेट केले. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप-मनसे युती होणार का, याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे, या भेटीकडे अनेकांच्या नजरा आणि कॅमेरे लागले आहेत. मात्र, या भेटीबाबत स्वत: गडकरींनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

''राज ठाकरेंच्या कुटुंबीयांशी माझे गेल्या 30 वर्षांपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे, त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी आणि त्यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी मी शिवतिर्थ या बंगल्यावर पोहोचलो. या भेटीमागे कुठलंही राजकीय कारण नाही. या भेटीकडे कौटुंबिक स्नेहभेट म्हणून बघता येईल,'' असेही गडकरींनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. 

राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यापासून ते मोहित कंबोज यांच्यापर्यंत भाजपच्या सर्वच राजकीय नेत्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचं समर्थन केलं. प्रविण दरेकर यांनीदेखील राज ठाकरे यांचं भाषण हे सर्वस्पर्शी आणि भविष्याचा वेध घेणारं होतं असं म्हटलं होतं.

काय म्हणाले होते दरेकर ?

भारतीय जनता पक्षाची विचारधारा, हिंदुत्वाची भूमिका, महाराष्ट्र मागे चाललाय यासंदर्भातील भूमिका अशी मिळती जुळती भूमिका भाजपचीही आहे. येणाऱ्या काळात काय होईल हे माहित नाही. परंतु निश्चितच त्यांची भूमिका भाजपच्या विचारधारेला सुसंगत आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात चिंता करणारी आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेवर टीका केली. आमच्या दृष्टीनं त्यांच्या भूमिका स्वागतार्ह आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं चांगल्या वाटत असल्याचंही ते म्हणाले होते. 

टॅग्स :नितीन गडकरीराज ठाकरेमुंबईमनसे