Join us  

Nitin Gadkari: नितीन गडकरी तेव्हापासून अस्वस्थच आहेत, शिवसेनेनं सांगितलं भाजपचं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 6:19 AM

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना शिवसेनेनं गडकरी यांच्यातील समाजकारणी आणि नितीवान राजकीय व्यक्तीमत्त्वावर प्रकाश टाकला आहे.

मुंबई - देशाच्या राजकारणात ज्यांच्या शब्दांना सामाजिक महत्त्व आहे, त्यापैकी एक राजकारणी म्हणजे भाजप नेते नितीन गडकरी. मोदी सरकारमधील स्पष्टवक्ता नेता, मंत्री म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या नितीन गडकरींचं नागपूरमधील भाषण सध्या सोशल मीडियासह राजकारणातही चांगलंच चर्चेचं बनलं आहे. अनेकदा त्यांच्या मनात राजकारण सोडण्याचे विचार येत असल्याची खळबळजनक कबुली त्यांनी दिली. जेव्हा विचार करतो तेव्हा राजकारण नेमके कशासाठी करायला हवे, हे लक्षात येते असेही ते म्हणाले. गडकरींच्या या भाषणाचा सार घेऊनच शिवसेनेनं आज सामनातून अग्रलेख लिहिला असून गडकरी भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचं संपादकांनी म्हटलं आहे. 

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना शिवसेनेनं गडकरी यांच्यातील समाजकारणी आणि नितीवान राजकीय व्यक्तीमत्त्वावर प्रकाश टाकला आहे. तसेच, दुसऱ्यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताना गडकरींसोबत झालेल्या राजकारणापासूनच ते अस्वस्थ असल्याचंही संजय राऊत यांनी सामनातून म्हटलं आहे. अत्यंत लहान वयात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, पण दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायची वेळ आली तेव्हा त्यांच्याविरुद्ध कुभांड रचून रोखण्यात आले. गडकरी यांच्या अनेक संस्थांवर तेव्हा 'ईडी'सह तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या, त्यांना बदनाम केले गेले. गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी 'टर्म' मिळाली असती तर देशाचा राजकीय इतिहास पूर्णपणे बदललेला दिसला असता. गडकरी तेव्हापासून अस्वस्थच आहेत. त्यांची अस्वस्थता अधूनमधून व्यक्त होत असते, पण त्यासाठी व्यासपीठ नागपूरचेच असते हे विशेष, असे म्हणत राऊत यांनी गडकरींच्या राजकीय अस्वस्थेवर भाष्य करताना बदलल्या भाजपच्या राजकारणाकडे लक्ष्य केंद्रीत केलं आहे.

गडकरींची ती भाषा वेदनादायी

अलीकडे नितीन गडकरी यांच्या अनेक वक्तव्यांतून लोकभावनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. गडकरी यांचे नागपूरचे भाषण सगळय़ांनाच विचार करायला लावणारे आहे. ''सध्या 'राजकारण' या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आली आहे. महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे राजकारण कधी सोडतो असे वाटायला लागले आहे,'' अशी निरवानिरवीची भाषा गडकरी यांनी करावी हे वेदनादायी आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत. त्यांना जे चालले आहे ते असहय़ होत आहे, पण करायचे काय? या प्रश्नाने सतावले आहे. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे अधिक महत्त्वाचे आहे. काही माणसे आयुष्यभर जीवनमूल्यांकरिता संघर्ष करतात, मात्र ती राजकारणात यशस्वी ठरतातच असे नव्हे. नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्ही वेगळय़ा गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर गडकरी यांनी नेमके बोट ठेवले आहे. गडकरी हे स्वतःला सध्याच्या राजकारणात 'फिट' मानत नाहीत. सभोवती गारद्यांचा गराडा आहे व हाती अनीतीच्या तलवारींचा खणखणाट सुरू आहे. त्यामुळे अस्वस्थ गडकरींनी नागपुरात मन मोकळे केले असे दिसते. सध्याचे राजकारण हे विचारांचे, नीतिमत्तेचे राहिलेले नाही. श्री. गडकरी यांनी गांधी काळातील राजकारणाचा उल्लेख केला, पण भारतीय जनता पक्षाला गांधी विचार मान्य नाहीत. तरीही गडकरी गांधींचा संदर्भ देतात हे महत्त्वाचे.

समाजकारण टिकले तर राजकारण टिकेल

अत्यंत कसोटीच्या काळातून हे राष्ट्र, महाराष्ट्र व समाज जात आहे. माणसे विकत घेणे व माणसांची बोली लावणे हाच राजकारणाचा धर्म बनला आहे. या वातावरणात नितीन गडकरी यांचे बोलणे थोडे निराशेचे असले तरी मनगटांत चेतना निर्माण करणारेही आहे. सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात गडकरी हे सगळ्या त अनुभवी व कार्यक्षम मंत्री आहेत. राजकीय सूडबुद्धीने वागणारे ते नेते नाहीत. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे समाजकारण टिकले तरच राजकारण टिकेल या भूमिकेवर ते ठाम आहेत.

गडकरींचा किल्ला अभेद्य राहावा

नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर गडकरी यांनी नेमके बोट ठेवले आहे. नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्के अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पाया भक्कम आहे. समाजकारणासाठी गटारी राजकारण सोडण्याची प्रेरणा त्यांना नागपुरातूनच मिळत असावी. गडकरी बोलतात म्हणून निदान झाडा-पानांत थोडी तरी सळसळ होते, नाहीतर लोकशाहीचे सर्वच वृक्ष सध्या वठलेले दिसतात. गडकरींचा किल्ला अभेद्य राहावा ही लोकशाहीची गरज आहे!

टॅग्स :नितीन गडकरीशिवसेनाउद्धव ठाकरेभाजपाराजकारण