मुंबई - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका टेलिव्हिजन कार्यक्रमादरम्यान केलेले विधान भाजपासाठी डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान देशवासीयांना एक मोठे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. 'प्रत्येक देशवासीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील', असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले होते. दरम्यान संबंधित कार्यक्रमात मोदींनी दिलेल्या आश्वासनाबाबत बोलताना गडकरींनी म्हटलं की, 'आम्ही सत्तेत कधीही येऊ शकणार नाही, यावर आम्हाला पूर्ण विश्वास होता. यासाठी आम्हाला मोठ-मोठी आश्वासनं देण्याचा सल्ला देण्यात आला होता.'
( तेलाच्या वारेमाप आयातीमुळे देशासमोर गंभीर आर्थिक संकट - नितीन गडकरी )
कार्यक्रमादरम्यान गडकरी यांनी असेही म्हटले की,'आता आम्ही सत्तेत आहोत. सत्तेत येण्यापूर्वी आमच्याकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची आठवण जनता आम्हाला करुन देते. पण यावर सध्या आम्ही केवळ हसतोय आणि पुढे जातोय.' गडकरींनी हे विधान करुन विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत नितीन गडकरींवर निशाणादेखील साधला आहे.
' खोटी आश्वासनं देऊ भाजपा सत्तेत आली आहे, हे गडकरींच्या विधानावरुन सिद्ध झाले आहे', अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आहे. पुढे ते असंही म्हणालेत की,'तुम्ही बरोबर आहात. आता तर जनतादेखील असा विचार करू लागली आहे की, सरकारनं त्यांच्या अपेक्षा आणि विश्वासाचा वापर पक्षाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला आहे.'
पण सरकारनं दिलेल्या एकूणच सर्व आश्वासनांची पूर्तता केव्हा होणार, असा प्रश्न सर्वसामान्य जनता उपस्थित करत आहेत.