Join us

नितीन गडकरींना उड्डाणपुलाजवळ बोलव, बाळासाहेबांनी राज ठाकरेंजवळ आग्रह धरला तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 1:16 PM

बाळासाहेबांकडून मी राजकारणातील सगळ्या गोष्टी शिकलो. जात,धर्म,पंथ यापलिकडे जाऊन बाळासाहेबांनी राजकारण केल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. गडकरी यांनी इंडिया टुडेच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखात गडकरींनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या

ठळक मुद्देबाळासाहेबांकडून मी राजकारणातील सगळ्या गोष्टी शिकलो. जात,धर्म,पंथ यापलिकडे जाऊन बाळासाहेबांनी राजकारण केल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. गडकरी यांनी इंडिया टुडेच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखात गडकरींनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या

मुंबई - शिवसेना आणि भाजपाची राजकीय मैत्री तुटली असली तरी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्याबद्दलचा जिव्हाळा आजही भाजपा नेत्यांमध्ये कायम असल्याचेच दिसून येते. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी, राणेंनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. तर, आता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू उलघडले आहेत.   

बाळासाहेबांकडून मी राजकारणातील सगळ्या गोष्टी शिकलो. जात,धर्म,पंथ यापलिकडे जाऊन बाळासाहेबांनी राजकारण केल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. गडकरी यांनी इंडिया टुडेच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखात गडकरींनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. यावेळी, त्यांनी दोन घटनांचा आवर्जुन उल्लेख केला आहे. त्यामध्ये, बाळासाहेबांसोबत काढलेल्या फोटोची आठवणही त्यांनी सांगितली. 

मी बाळासाहेबांकडून सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याचा माझ्या परिने प्रयत्न केला आणि सार्वजनिक जीवनात मला त्या गोष्टी उपयुक्त ठरत आहेत. त्यांनी माझ्यावर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं. ते असे नेते होते जे एखादा प्रसंग आला तर धर्म, जात, पंथ, निष्ठा याच्याही पलिकडे जाऊन निर्णय घेऊ शकत होते. ती ताकद त्यांच्यामध्ये होती. आजवर अनेक महापुरुषांचं मार्गदर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या दिग्गजांपैकीच एक होय, असे नितीन गडकरी यांनी इंडिया टुडेच्या लेखात म्हटले आहे. बाळसाहेब ठाकरे यांनी माझ्या मनावर व्यक्तिमत्वावर आणि सार्वजनिक जीवनावर मोठा प्रभाव टाकण्याचं काम केलं. मी जेव्हा भूतकाळात डोकावून पाहतो तेव्हा मला स्वतःच्या मातीची गर्जना करणारा वाघच त्यांच्या रूपाने दिसतो. बाळासाहेब ठाकरे मला स्वर्गातूनही आशीर्वाद देत असतील याची मला खात्री आहे, अशी भावनिकताही त्यांनी बोलून दाखवली.   

गडकरींचं बाळासाहेबांसोबत फोटोशूट

राज ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यावर चित्रचरित्र करायचं ठरवलं तेव्हाचा प्रसंग आठवतो. जुन्या आणि काही नव्या फोटोंचा संग्रह त्यामध्ये आहे. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंकडे आग्रह धरला की उड्डाण पुलाजवळ गडकरींना बोलव. मला बोलवल्याप्रमाणे मी उड्डाण पुलाजवळ गेलो तिथे आम्ही फोटोसाठी पोझ दिली. माझ्या मनात ती आठवण आजही कायम आहे. माझ्या मनावर जणू ती कोरली गेली आहे, असंच म्हटलं तरीही चालणार आहे. एक सच्चे जननेते म्हणून बाळासाहेब ठाकरे माझ्या स्मरणात कायम राहतील, असा प्रसंग गडकरींनी सांगितला. तसेच, एक दिग्गज नेते आणि मार्गदर्शक असलेल्या बाळासाहेबांना गडकरींनी लेखातून विनम्र आदरांजलीही वाहिली. 

टॅग्स :नितीन गडकरीराज ठाकरेशिवसेनाबाळासाहेब ठाकरे