नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव; विवेक फणसाळकरांकडेही मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 07:06 PM2023-12-31T19:06:19+5:302023-12-31T19:23:03+5:30
नितीन करीर हे १९८८च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते आजच मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून पदाची जबाबदारी स्वीकारतील.
मुंबई : राज्याच्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. नितीन करीर यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीर हे १९८८च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते आजच मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारतील. करीर यांच्यासह आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळही पूर्ण झाल्याने ते आज निवृत्त होत असून महासंचालकपदाची तात्पुरती जबाबदारी विवेक फणसाळकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त होत असलेल्या मनोज सौनिक यांनी १९९०मध्ये जालनाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली होती. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या मनोज सौनिक यांनी मंत्रालयात वस्त्रोद्योग, परिवहन विभागाचे प्रधान सचिव तर सार्वजनिक बांधकाम, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केलं आहे.
विवेक फणसाळकर यांची कारकीर्द
विवेक फणसाळकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अकोल्याचे पोलीस अधीक्षक म्हणून सेवेला सुरुवात करणाऱ्या फणसाळकर यांनी वर्धा, परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. नाशिक, नागपूर, पुण्यामध्ये उत्तम कामगिरी बजावल्यानंतर मुंबईत यापूर्वी सह. आयुक्त वाहतूक, प्रशासन म्हणून काम पाहिले आहे. पुढे, राज्य दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे.
२०१८ मध्ये त्यांची ठाणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. तेथून यावर्षी फणसाळकर यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळात नियुक्ती करण्यात आली होती. अनेक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील प्रकरणात फणसाळकर यांनी कामगिरी बजावली आहे.