चुकीला माफी नाही! तरुणींची छेड काढणाऱ्या विकृतास नितीन नांदगावकर यांनी शिकवला धडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 06:49 PM2020-02-17T18:49:03+5:302020-02-17T18:54:14+5:30
Nitin Nandgaonkar : जिथे जिथे मुलींवर अत्याचार होतील आणि ते नराधम वासनेने पछाडलेले मोकाट फिरत असतील तिथे तिथे जाऊन त्यांना ठोकणार
मुंबई - काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड स्थानकातील पादचारी पुलावर एक विकृत तरुण तरुणींना अश्लील स्पर्श करून पळ काढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, हा तरुण पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही तक्रारीअभावी सुटला होता. आता शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी या तरुणास पकडून त्याला अद्दल घडवली आहे.
रजिउर खान (३७) असे या विकृताचे नाव आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील आणि सध्या वडाळा येथे राहणाऱ्या रजिउरने २५ जानेवारी रोजी माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर महिलांच्या पार्श्वभागाला स्पर्श करणे, त्यांचे चुंबन घेणे असे अश्लील चाळे करून पळ काढत असे. त्यानंतर २६ जानेवारीलाही महिला प्रवाशांसोबत त्याने असेच अश्लील वर्तन केले होते. दरम्यान, या रजिऊरला नितीन नांदगावकर यांनी पकडून फटके दिले आहेत.
तसेच ''हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून महाराष्ट्रातील तमाम माता -भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो. रयतेच्या राज्यात माता -भगिनींकडे ह्यापुढे कोणीच वेड्या वाकड्या नजरेने बघू नये. जिथे जिथे मुलींवर अत्याचार होतील आणि ते नराधम वासनेने पछाडलेले मोकाट फिरत असतील तिथे तिथे जाऊन त्यांना ठोकणार. मग तो कोणत्याही जाती-धर्मचा असूदेत त्याची धिंड काढली जाईल '' असा इशारा नितीन नांदगावकर यांनी दिला आहे.
दरम्यान, प्रवाशांचे पाकीट, मोबाइल चोरी या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली रजिउर खान याला अटक केली होती. सखोल चौकशीअंती त्याने चोरीचा गुन्हा आणि अश्लील चाळे करीत असल्याचे कबूल केले होते. त्या वेळी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर तो तरुणींना अश्लील स्पर्श करताना दिसला. मात्र त्या तरुणींनी तक्रार दाखल केलेली नाही. त्यांनी तक्रार केल्यास या प्रकरणी खानवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले होते. मात्र याप्रकरणी तक्रार दाखल झाली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या