Nitin Nandgaonkar: 'सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला शिवसेना उपनेतेपद, मी आयुष्यभर ऋणी राहिल'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:20 AM2022-06-10T11:20:46+5:302022-06-10T11:22:21+5:30
गरिबांच्या प्रश्नांना खळ-खट्याकने सोडविण्याची नितीन नांदगावकर यांची स्टाईल मनसेत असताना सर्वपरिचित झाली.
मुंबई - सोशल मीडियावर आपल्या हटकेस्टाईलने प्रसिद्ध असलेल्या नितीन नांदगांवकर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली आहे. नितीन नांदगावकर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नितीन नांदगांवकर यांच्यावर जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत.
गरिबांच्या प्रश्नांना खळ-खट्याकने सोडविण्याची नितीन नांदगावकर यांची स्टाईल मनसेत असताना सर्वपरिचित झाली. आपले काम फेसबुकच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ते पोहोचले आहेत. तर, मुंबईतही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याच्या आंदोलनावेळीही त्यांनी रस्त्यावर उतरुन थेट राणा दाम्पत्यास इशारा दिला होता. आता, त्यांना शिवसेनेनं मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे, त्यांनी शिवसेना नेत्यांचे आभार मानले तसेच माझे काम अविरतपणे करत राहणार, पक्षासाठी मोठं काम करणार, असेही ते म्हणाले.
माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली. त्याबद्दल, मी आपल्या चरणी नतमस्तक होतो. मी आयुष्यभर आपला ऋणी राहिल, असे म्हणत नितीन नांदगावकर यांनी शिवसेना उपनेतेपदी निवड केल्याबद्दल आभार मानले. गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून मी उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनता दरबार भरवून लोकांच्या, गोरगरिबांच्या समस्या सोडवत आहे. मी वेळोवेळी सरकारी दफ्तरी, महिला, पोलीस बांधव, बिल्डर किंवा रुग्णालयाचा विषय असू द्या, मी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचं काम केलंय, असे ते म्हणआले.
मी रश्मी वहिनी, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, विनायक राऊत, अनिल देसाई, वरुण देसाई यांच्या मार्गदर्शनात यापुढेही शिवसेनेचा हा जनता दरबार असाच सुरू राहिल. यापुढेही गोरगरीब जनतेची अशीच सेवा हा शिवसैनिक करत राहिल. शिवसेनेचं आणि आपल्या पक्षाचं नाव मोठं करत राहिल, असा विश्वासही नांदगांवकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
रुपाली पाटील यांनी केलं अभिनंदन
नितीन नांदगावकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे. राजकारणात काय कमावले असेल तर दमदार, विश्वासू भाऊ, बहिणी, मैत्रिणी सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज, डॅशिंग नेते नितीन नांदगावकर, असं म्हणत रुपाली पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.