राष्ट्रवादीचे नितीन पाटील परिवहन सभापती
By Admin | Published: April 10, 2015 10:59 PM2015-04-10T22:59:29+5:302015-04-10T22:59:29+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदाच्या शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत अनपेक्षितपणे राष्ट्रवादीचे
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदाच्या शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत अनपेक्षितपणे राष्ट्रवादीचे नितीन पाटील विजयी झाले आहेत. या संपूर्ण सत्ता समीकरणात शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन एक प्रकारे सेनेला धक्का दिला आहे.
परिवहन समितीत शिवसेना ५, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे प्रत्येकी २ असे पक्षीय बलाबल आहे. सभापतीपदासाठी युतीकडून शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी तर आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नितीन पाटील रिंगणात होते. शुक्रवारी सकाळी ११.३० वा. स्थायी समितीच्या सभागृहात ही निवडणूक झाली. मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांना काँगे्रस राष्ट्रवादीसह मनसे आणि भाजपा सदस्यांची साथ लाभली. यात सर्वाधिक ८ मते त्यांच्या पारड्यात पडल्याने पाटील हे सभापतीपदी निवडून आल्याची घोषणा पीठासीन अधिकारी अप्पर आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून करण्यात आली. चौधरी यांना केवळ ५ मते मिळाली. सर्वाधिक सदस्य संख्या असूनही झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजपाने गद्दारी केल्याची टीका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तर यंदा सभापतीपद द्या, अशी मागणी केली होती. तसेच पिसवली ग्रामपंचायतीत झालेल्या पराभवाचा वचपा काढल्याचे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीला शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान, पराभव होताच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतून काढता पाय घेतला तर शिवसेनेच्या पराभवाने भाजपासह विरोधकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पसरले होते.