मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री व जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय नेते नितीशकुमार, तसेच उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव गुरुवारी मुंबईत येत असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून नितीशकुमार देशभरातील बिगर भाजप पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची नितीशकुमार यांनी आतापर्यंत भेट घेतली आहे.
नितीशकुमार दुपारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ठाकरे यांनी त्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे, तर संध्याकाळी ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवार यांची भेट घेणार आहेत.