श्वसन, रक्ताभिसरण आणि मेंदूच्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे
सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतातील मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, जयपूर आणि लखनऊ या ८ शहरांमध्ये नायट्रोजन डायऑक्साईडच्या प्रदूषणाचा अभ्यास करण्यात आला आहे. ग्रीनपीस इंडियाच्या बिहाइंड द स्मोकस्क्रीन या नव्या अहवालामधील निष्कर्षानुसार, दिल्लीमधील प्रदूषणात प्रचंड वाढ दिसून आली आहे तर मुंबईमध्ये नायट्रोजन डायऑक्साईडच्या प्रदूषणात ५२ टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
कोविडमुळे देशभरात करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनच्या एक वर्षानंतर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आठ राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या अभ्यासामध्ये प्रदूषणात वाढ झाल्याचे आढळले आहे. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, जयपूर आणि लखनऊ या शहरांपैकी दिल्लीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आढळून आले, असे वातावरण या संस्थेचे संस्थापक भगवान केसभट यांनी सांगितले.
मोटार असलेल्या बहुतेक वाहनांमध्ये जेव्हा इंधनाचे ज्वलन होते, वीजनिर्मिती करण्यात येते आणि औद्योगिक प्रक्रिया केल्या जातात तेव्हा वातावरणात नायट्रोजन डायऑक्साईडचे उत्सर्जन होत असून, हा प्रदूषण करणारा सर्वात धोकादायक घटक आहे. नायट्रोजन डायऑक्साईडच्या संपर्कात आल्यामुळे सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यात श्वसनाच्या समस्या, रक्ताभिसरण यंत्रणेच्या समस्या आणि मेंदूच्या समस्यांचा समावेश आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागण्याचे आणि मृत्यूचे प्रमाणही वाढते.
..........
जीवाश्म इंधनाच्या वापरावरील आपल्या अवलंबित्वाची भारी किंमत शहरे आणि लोक मोजत आहेत, हे असे बराचकाळ सुरू राहू शकत नाही. पर्यावरणस्नेही, योग्य आणि शाश्वत विकेंद्रीत ऊर्जा स्रोत म्हणजे छतावरील सौरऊर्जेचा वापर आणि पर्यावरणस्नेही व शाश्वत वाहतूक यंत्रणा यावर भर असला पाहिजे.
- अविनाश चंचल, सीनियर क्लायमेट कॅम्पेनर, ग्रीनपीस इंडिया
........................
जीवाश्म इंधनाशी संबंधित हवेच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आणि हे अनेक अहवालांमधून दिसून आले आहे. असे असतानाही आपण अजूनही जीवाश्म इंधन म्हणजेच कोळसा, तेल व गॅस यावर अवलंबून आहोत. बहुतेक शहरांमधील दूषित हवेसाठी एकूणच आर्थिक यंत्रणेमध्ये झालेली वाढ कारणीभूत आहे.
...............................
मुंबईत सुमारे ४० लाख खासगी वाहने आहेत.
आपली वाहतूक यंत्रणा अनियंत्रित आहे.
खासगी वाहनांच्या संख्येला आणि ही वाहने शहरात धावण्याला आळा घालणे हा अजेंडा असला पाहिजे.
किमान प्रदूषण करणारी वाहतूक यंत्रणा राबविली पाहिजे.
सार्वजनिक परिवहन सेवेला चालना दिली पाहिजे.
जुन्या वाहनांचा वापर थांबविला पाहिजे.
व्यावसायिक वाहनांचा वापर टप्प्याटप्प्याने थांबविला पाहिजे.
भंगार धोरण राबविण्याची आवश्यकता आहे.
रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानासह असलेली रस्त्यावर होणाऱ्या उत्सर्जनावर लक्ष ठेवणारी यंत्रणा आवश्यक आहे.
शहर व्यवस्थापन योजनेंतर्गत वाहतूक धोरण-सार्वजनिक परिवहन यंत्रणेची व्याप्ती वाढविणे आवश्यक आहे.
निश्चित पार्किंग धोरण हवे.
पादचारी मार्गांचे विस्तारीकरण हवे.
........................
सॅटेलाईट निरीक्षण : एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१
मुंबईतील नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रदूषण ५२ टक्के वाढले
दिल्लीमध्ये १२५ %
चेन्नई ९४ %
बंगळूरू ९० %
जयपूर ४७ %
कोलकाता ११ %
लखनऊ ३२ %
हैदराबाद ६९ %