पुणे - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी सगेसोयरे आणि ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. जरांगे आता महाराष्ट्र दौरा करणार असून पुन्हा एकदा मराठा समाजाला साद घालणार आहेत. मात्र, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊनही जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेवर ओबीसी नेते हल्लाबोल करत आहेत. त्यातच, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला आपलं समर्थन नसल्याचं जाहीर केलं. तसेच, जरांगेंना महत्त्वाचा सलाही आंबेडकरांनी दिला आहे.
परभणीतील ओबीसी, भटके, विमुक्त यांच्या एल्गार सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजातील धनदांडग्यांवरही हल्लाबोल केला. तसेच, मनोज जरांगे यांनाही या निजामी मराठ्यांमुळेच गरीब मराठा समाजाचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं. ''जो जो उपेक्षित आहे, त्या उपेक्षितांना न्याय देण्याची आमची भाषा आहे. मी आजच जरांगे पाटील यांचं वक्तव्य ऐकलं. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला भाजपाला धडा शिकवायाचाय. माझा जरागेंना सल्ला आहे, या भाजपासोबतच आपल्याला जो निजामी मराठा आहे, त्यांनाही धडा शिकवायचाय,'' असे प्रकाश आंबेडकरांनी परभणीतील जाहीर सभेतून म्हटले.
आमच्या गरीब मराठ्यांची ही अवस्था कोणी केली असेल, तर प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं, ज्यांचे सहकारी कारखाने उभे राहिले, दूध संस्था उभ्या राहिल्या, डीसीसी बँका उभ्या राहिल्या, त्यांनी या गरीब मराठ्याला संस्थेत पाय ठेऊ दिला नाही, ही परिस्थिती आहे. त्या संस्थांमध्ये भागिदारी करुन घेतला नाही, म्हणून ही परिस्थिती आहे. त्यामुळेच, माझा जरांगे पाटलांना सल्ला आहे की, फडणवीसांबरोबर, भाजपाबरोबर हिशेब करायचा असेल तर, या निजामी मराठ्यांचा तुम्ही जोपर्यंत हिशेब करणार नाही, तोपर्यंत गरीब मराठ्याला आपण न्याय देऊ शकणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात जाहीरपणे म्हटले.
आपण वेगळं ताट करू - आंबेडकर
शिवाजी महाराजांनी मावळ्यांना हाताशी धरलं, अठरा पगड जातीच्या मावळ्यांना हाताशी धरुन शिवाजींनी स्वत:चं राज्य प्रस्थापित केलं. जरांगे पाटील माझा आपणास सल्ला आहे, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा ओबीसी देखील लढायला तयार आहे. पण, त्याची अट तुम्ही मान्य केली पाहिजे, त्याची अट एकच आहे की माझं ताट माझ्याकडे राहू द्या. आपण वेगळं ताट करु, ज्यातून गरीब मराठ्यांना आरक्षण देऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. प्रकाश आंबेडकरांच्या या विधानातून त्यांनी ओबीसीतून मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.