नवी मुंबई : तोट्यात चाललेल्या परिवहन उपक्रमाचा कारभार सुधारण्यासाठी एनएमएमएटी व्यवस्थापनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अधिकाधिक प्रवाशांनी परिवहन सेवेचा लाभ घ्यावा, यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून व्यवस्थापनाने २३ फेब्रुवारी रोजी बस डे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या जनजागृती अभियानाला सोमवारपासून शुभारंभ करण्यात आला. परिवहनच्या ताफ्यात साध्या व वातानुकूलित अशा एकूण २७0 बसेस आहेत. मुंबई, ठाणे, पनवेलसह नवी मुंबई परिसरातील ५४ मार्गांवर या बसेस धावतात. या बसेसमधून दरदिवशी २ लाख ४0 हजार प्रवासी प्रवास करतात. त्याचबरोबर शहरात बाहेरून येणाऱ्या खासगी वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने श्वसनाचे आजार होत आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना किमान एक दिवस तरी स्वच्छ व प्रदूषितविरहित हवा मिळावी, या उद्देशाने परिवहन उपक्रमाने बस डे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर टाळून परिवहन वाहतुकीचा अवलंब करावा, हा सुद्धा यामागचा हेतू आहे. सोमवारी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील शाळा, कॉलेजेस, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, सहकारी आणि खासगी अस्थापने आदी नागरिकांशी या उपक्रमाबाबत संवाद साधणार आहेत. अधिकाधिक प्रवाशांनी एनएमएमटीचा वापर करावा, यादृष्टीने उपक्रमाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार बस डेच्या पार्श्वभूमीवर ३५0 बसेस रस्त्यावर सोडण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी बस डेच्या दिवशी खासगी वाहनांचा वापर न करता परिवहनच्या बसेमधून प्रवास करावा, यासाठी विविध स्तरांवर जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर केला जाणार आहे.
एनएमएटीचा २३ फेब्रुवारीला बस डे
By admin | Published: February 16, 2016 2:57 AM