मुंबईतील पाणीकपात मागे घेण्‍याचा निर्णय महापालिकेने घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 03:38 PM2020-08-28T15:38:24+5:302020-08-28T15:43:46+5:30

तलाव क्षेत्रात झालेल्‍या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ

NMC decided to withdraw water cut in Mumbai | मुंबईतील पाणीकपात मागे घेण्‍याचा निर्णय महापालिकेने घेतला

मुंबईतील पाणीकपात मागे घेण्‍याचा निर्णय महापालिकेने घेतला

Next
ठळक मुद्देसातही तलाव क्षेत्रातील एकूण जलसाठा ९५.१९ टक्‍क्‍यांवर

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांच्‍या पाणलोट क्षेत्रात गेल्‍या काही दिवसांत झालेल्‍या दमदार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. आज सकाळी ६ वाजता करण्‍यात आलेल्‍या मोजणीनुसार सातही तलावातील एकूण जलसाठा हा ९५.१९ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. ही बाब लक्षात घेऊन दिनांक ५ ऑगस्‍ट २०२० पासून लागू करण्‍यात आलेली पाणीकपात मागे घेण्‍याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यानुसार दिनांक २९ ऑगस्‍ट २०२० पासून बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्राला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्‍याचबरोबर बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्‍या जाणा-या ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर संबंधित गावांचा पाणीपुरवठा नियमित करण्‍याचेही ठरविण्‍यात आले आहे, अशी माहिती बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे. 

यंदाच्‍या पावसाळ्यादरम्‍यान जून व जुलै महिन्‍यात तलाव क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस झाला होता. परिणामी, जुलै अखेरीस तलावांमधील एकूण जलसाठा हा केवळ ३४ टक्‍के उपलब्‍ध असल्‍याने बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिनांक‍ ५ ऑगस्‍ट २०२० पासून २० टक्‍के पाणीकपात लागू केली होती. त्‍यानंतर तलाव क्षेत्रात झालेल्‍या दमदार पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन दिनांक २१ ऑगस्‍ट २०२० पासून पाणीकपात २० टक्‍क्‍यांवरुन १० टक्‍के करण्‍यात आली होती. त्‍यानंतर तलाव क्षेत्रात सातत्‍याने पावसाने हजेरी लावल्‍याने जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. यानुसार आज सकाळी सातही तलाव क्षेत्रात एकूण १३ लाख ७७ हजार ६९० दशलक्ष लिटर अर्थात ९५.१९ टक्‍के एवढा नोंदविण्‍यात आला आहे. आजच्‍याच दिवशी गेल्‍यावर्षी म्‍हणजेच २८ ऑगस्‍ट २०१९ रोजी तलाव क्षेत्रातील एकूण पाणीसाठा हा ९६.४३ टक्‍के इतका होता. तर २८ ऑगस्‍ट २०१८ रोजी एकूण जलसाठा हा ९४.८९ टक्‍के इतका होता.

Web Title: NMC decided to withdraw water cut in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.