Join us

छतदुरुस्तीसाठी महापालिकेला मुहूर्त नाही

By admin | Published: April 19, 2016 2:47 AM

मालाडच्या नेमाणी हेल्थ सेंटरमध्ये मोडकळीस आलेल्या सिलिंगच्या दुरुस्तीचा मुहूर्त अद्याप पालिकेला मिळालेला नाही. अर्धवट तुटलेल्या आणि सध्या लोंबकळत असलेल्या

गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबईमालाडच्या नेमाणी हेल्थ सेंटरमध्ये मोडकळीस आलेल्या सिलिंगच्या दुरुस्तीचा मुहूर्त अद्याप पालिकेला मिळालेला नाही. अर्धवट तुटलेल्या आणि सध्या लोंबकळत असलेल्या या सिलिंगला जवळपास वर्ष लोटले आहे. त्यामुळे या ठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या शेकडो लहानग्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.मालाड पश्चिमच्या एस. व्ही. रोड परिसरात नेमाणी हेल्थ सेंटर आहे. या ठिकाणी विशेषत: मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी विविध लसी लहान मुलांना दिल्या जातात. ज्यात नवजात बालकांचाही समावेश मोठ्या प्रमाणात असतो, तसेच या मुलांसोबत त्यांचे पालकदेखील या ठिकाणी येतात. सध्या या सिलिंगची अवस्था अत्यंत वाईट बनली आहे. ते कधीही कोसळू शकते, अशा स्थितीत आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात याच सिलिंगचा अर्धा भाग अचानक कोसळला, ज्यात या ठिकाणी कार्यरत असलेली परिचारिका किरकोळ जखमी झाली होती. त्यानुसार हेल्थ सेंटरच्या डिस्पेन्सरी विभागाने पालिकेच्या पी उत्तर विभागाला एक पत्र लिहिले होते. ज्यात या सिलिंगबाबत माहिती देत, ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याची विनंती करण्यात आली होती. भर पावसाळ्यामध्ये हा प्रकार घडला होता. मात्र, आता पुढचा पावसाळा आला, तरी याबाबत कोणतेच ठोस पाऊल पालिकेच्या पी उत्तर विभागाने उचललेले नसल्यामुळे, येथे येणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.