मुंबई - गेल्या तीन दिवसापासून लसींच्या डोसचा अभाव असल्याने मुंबईतील लसीकरण मोहिमेत खंड पडत आहे. सातत्याने येणाऱ्या या अडथळ्यामुळे मुंबईतील लसीकरण मोहीम कासवगतीने सुरू आहे, नुकतेच शहर उपनगरात एका दिवसात दोन लाख डोस देण्यात आले. त्यानंतर पुन्हा तुटवडा जाणवल्याने लसीकरण मर्यादित केंद्रावर सुरू राहिले. पालिकेला बुधवारी रात्री उशिरा १ लाख ४१ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. आता सर्व केंद्रावर लसीकरण सुरळीत सुरू होईल.
पालिकेला पुण्याहून १ लाख ४१ हजार ९० डोस प्राप्त झाले आहेत. त्यात १ लाख ३४ हजार कोविशिल्डचे डोस देण्यात आले असून, ७ हजार ९० कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत.
पालिकेच्या लसीकऱण केंद्रावर गुरुवारपर्यंतचे डोस होते, पण त्यातही बऱ्याच केंद्रावर मोहीम बंद ठेवण्यात आली. गुरुवारी अत्यंत मर्यादित लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू होते. लसींचा साठा पालिकेकडे उपलब्ध झाला आहे. आजपासून पुन्हा लसीकरण पूर्ववत होईल, अशी माहिती पालिकेने दिली आहे.
गेल्या आठवड्यात मिळालेले डोस
कोविशिल्ड १ लाख ५० हजार
कोव्हॅक्सिन १० हजार २४०
बुधवारी रात्री मिळालेले डोस
कोविशिल्ड १ लाख ३४ हजार
कोव्हॅक्सिन ७ हजार ९०