महापालिका ‘निष्क्रिय’च!

By admin | Published: June 24, 2017 01:54 AM2017-06-24T01:54:21+5:302017-06-24T01:54:21+5:30

ऐन पावसाळ्यात मुंबई जलमय होऊ नये, म्हणून महापालिका प्रशासन सर्व स्तरावर प्रयत्न करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र, प्रशासनाच्या कारभारावर लोकप्रतिनिधींनी टीकेची झोड उठविली आहे

NMC is 'inactive'! | महापालिका ‘निष्क्रिय’च!

महापालिका ‘निष्क्रिय’च!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऐन पावसाळ्यात मुंबई जलमय होऊ नये, म्हणून महापालिका प्रशासन सर्व स्तरावर प्रयत्न करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र, प्रशासनाच्या कारभारावर लोकप्रतिनिधींनी टीकेची झोड उठविली आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा करणाऱ्या पंपिंग स्टेशन्सच्या कार्यवाहीबाबत प्रशासन निष्क्रीय असल्याचा ‘आवाज’ लोकप्रतिनिधींनी उठविला आहे. परिणामी, नालेसफाई आणि रस्त्याच्या कामानंतर, आता पावसाळ्यात पुन्हा एकदा पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींच्या ‘हिटलिस्ट’वर असून, मान्सूनदरम्यान मुंबई जलमय होणार का? या प्रश्नावर प्रशासनाने साधलेल्या मौनामुळे पंपिंग स्टेशन्सच्या कार्यवाहीची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडला की, प्रथमत: हिंदमाता पाण्याखाली जाते. येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने १०० कोटी रुपये खर्च केले आणि ब्रिटानिया पंपिंग स्टेशनची उभारणी केली, परंतु त्याची पाण्याची पातळी २५ मिलीमीटर ठेवण्यात आल्याने, येथील स्वयंचलित दरवाजे खुले झाले नाहीत. परिणामी, पंपाद्वारे पाण्याचा निचरा करणे भाग पडले. महत्त्वाचे म्हणजे, मागील वर्षी येथे पाण्याचा उपसा करण्यासाठी ३७ पंपांची मदत घेण्यात आली आणि आता ५५ पंप लावण्यात येणार आहेत. परिणामी, यासाठी करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पंपिंग स्टेशनचा उपयोग होणार कधी? या प्रश्नावर प्रशासन सध्यातरी निरुत्तर आहे.

पावसाळ्यात मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचून तलावसदृश स्थिती निर्माण होते. परिणामी, वाहतूक कोलमडण्यासह मुंबईकरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
शिवाय साचलेल्या पाण्याचा निचराही होत नाही आणि ठिकठिकाणी बसवण्यात आलेले उपसा पंप काम करेणासे झाल्याने मुंबापुरी जलमय होते.
मात्र, या वर्षीच्या पावसाळ्यात मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये आणि स्थिती सुधारावी, यासाठी मुंबई महापालिकेने तब्बल ३१३ ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप बसविण्याचा निर्णय घेतला.

मुंबई शहरात भायखळा, चिंचपोकळी, वरळी, दादर हिंदमाता, माटुंगा गांधी मार्केटसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सखल भाग, मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला डेपो, कमानी सिग्नल या व्यतिरिक्त विद्याविहार बस स्थानक परिसर, पश्चिम उपनगरात मिलन सब वे, अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरासह पश्चिम उपनगरातील सखल भागासह ठिकठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता आणि गांधी मार्केट येथे पाणी साचल्याने, पावसाळ्यात हा मार्ग पूर्णपणे ठप्प होतो. तर लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला डेपो आणि कमानी सिग्नल येथे पाणी साचल्याने, या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावतो.पश्चिम उपनगरात सांताक्रुझ येथील मिलन सब वे मध्ये साठलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक व्यवस्था कोलमडते. प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात सदर ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडतात.

ऐन पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाने सात ठिकाणी पंपिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला. हाजीअली, इर्ला, ब्रिटानिया, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, गझरबंध, माहुल व मोगरा पंपिंग स्टेशनचा यात समावेश आहे. गझरबंध पंपिंग स्टेशनचे काम सुरू आहे. मोगरा व माहुल पंपिंगचे काम प्रस्तावित असून, इतर पंपिंग कार्यान्वित झाले आहे.

वरळी येथील लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलँड पंपिंगच्या कामाला कंत्राटदाराने विलंब केल्याने, पालिकेने संबंधितांना दंड ठोठाविला आहे. मात्र, या प्रकरणात पालिकेचे नुकसान झाल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात ब्रिटानिया पंपिंग स्टेशन उभारण्यात आले, परंतु दादर, हिंदमाता, शिवडी, वडाळासह लगतच्या परिसरात पाणी साचलेच. परिणामी, पंपिंग स्टेशनचा उपयोग काय? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

Web Title: NMC is 'inactive'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.