नजरचुकीने महापालिकेने अधिकृत बांधकाम तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 03:14 AM2017-12-29T03:14:50+5:302017-12-29T03:14:59+5:30
मुंबई : दहिसर पूर्वेतील मराठा कॉलनी येथील ज्योती फैदी या विधवा महिलेच्या घराचे बांधकाम पालिकेच्या आर उत्तर विभागाने तोडले.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : दहिसर पूर्वेतील मराठा कॉलनी येथील ज्योती फैदी या विधवा महिलेच्या घराचे बांधकाम पालिकेच्या आर उत्तर विभागाने तोडले. त्यामुळे शिवसेनेने आर उत्तर साहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांना त्यांच्या कार्यालयात पाच तास घेराव घातला.
शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेनंतर नांदेडकर यांनी लेखी माफी मागून नजरचुकीने ही तोडक कारवाई करण्यात आल्याचे कबूल केले. शिवाय, सदर बांधकाम बांधून देण्याचे लेखी आश्वासन देण्याची नामुष्कीही साहाय्यक पालिका आयुक्तांवर ओढवली.
ज्योती फैदी यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले आहे. पतीचे अकरावे करण्याच्या दिवशीच ही घटना घडली. तर, या जागेलगत वैशाली पवार यांच्या इमारतीची संरक्षक भिंत तोडली, अशी माहिती आर मध्य व आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या वेळी विभाग क्रमांक एकचे विभागप्रमुख विलास पोतनीस, मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, महिला विभाग संघटक रश्मी भोसले, स्थानिक नगरसेवक हर्षद कारकर, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, नगरसेविका सुजाता पाटेकर, नगरसेविका माधुरी भोईर आणि शिवसैनिक उपस्थित होते.
दहिसर (पूर्व) प्रभाग क्रमांक सहाचे शिवसेना नगरसेवक हर्षद कारकर यांच्या वॉर्डमधील मराठा कॉलनीमधील गेली ६० वर्षे असलेल्या मराठी माणसांच्या अधिकृत बांधकामावर आर उत्तरच्या साहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी २६ डिसेंबर रोजी ही निष्कासनाची कारवाई केली. एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर ११ व्या दिवशी पुरावे असतानाही नांदेडकर यांनी पोलीस फाटा घेऊन अशी कारवाई करणे चुकीचे असल्याची संतप्त प्रतिक्रिया शीतल म्हात्रे यांनी दिली.
या साहाय्यक पालिका आयुक्तांविरोघात शिवसैनिकांनी आज जोरदार निदर्शने केल्यानंतर नांदेडकर यांनी नागरिकांची माफी मागितली व बांधकाम पालिकेच्या वतीने पुन्हा बांधून देण्याची तयारी दर्शविली. या मुजोर साहाय्यक अधिकाºयांविरोधात कारवाई करण्याची मागणी आपण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे केली असून सभागृहात आवाज उठवणार असल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली.