माेहिमेला देणार वेग : लससाठा उपलब्ध झाल्यास दररोज दोन लाख डोस देणे शक्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्यतज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला आहे. सध्या दररोज सरासरी एक लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. तर यापुढे दररोज सरासरी दोन लाख डोस देण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. १८ वर्षांवरील ९० लाख लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत ८७ लाख ४४ हजार ८१६ नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी २२ लाख ४२ हजार ६५५ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. या वेगाने नोव्हेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल, असा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला होता. मात्र आता सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तविण्यात आल्याने चिंता वाढली आहे.
सद्य:स्थितीत मुंबईत महापालिका, सरकार आणि खासगी मिळून ४३८ लसीकरण केंद्रे सुरू आहेत. यामध्ये मंगळवारी ५१ हजार ६२५ नागरिकांनी पहिला डोस तर ३२ हजार २५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. सुरुवातीला कोविन ॲपमध्ये आलेल्या अडचणी आणि त्यानंतर वारंवार पुरेसा डोस मिळत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला. तरीही गेल्या महिन्याभरात काही वेळा पावणेदोन लाख डोस एका दिवसात देणे शक्य झाले आहे. पुरेसा साठा उपलब्ध झाल्यास दररोज दोन लाख डोस देणे शक्य होईल, असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
एकूण लाभार्थी ९० लाख
आतापर्यंत दिलेले डोस - ८७ लाख ४४ हजार ८१६
पहिला डोस - ६५ लाख एक हजार २२१
दुसरा डोस - २२ लाख ४२ हजार ६५५