आधार कार्ड नाही मग बेघरांना लस कशी देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:06 AM2021-03-10T04:06:29+5:302021-03-10T04:06:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग पकडला आहे. आता तर ज्येष्ठ नागरिकांना सोबत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग पकडला आहे. आता तर ज्येष्ठ नागरिकांना सोबत ज्यांना व्याधी आहेत अशा नागरिकांनादेखील मुंबई महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी लस दिली जात आहे. या लसीकरणाच्या कार्यक्रमात ज्या नागरिकांकडे म्हणजे बेघर आणि भिक्षेकरी यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना लस कशी देणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई शहर आणि उपनगरातील भिक्षेकरी आणि बेघरांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेने मुंबई महापालिकेलादेखील हा प्रश्न विचारला असून, अद्यापदेखील याचे उत्तर मिळालेले नाही.
लसीकरणाची मोहीम सरकारी आरोग्य विभागाच्या पातळीवर जोरात सुरू आहे. या लसीकरणाच्या मोहिमेत कोविन ॲप महत्त्वाची भूमिका ठरत आहे. या ॲपमध्ये वयाची नोंद आवश्यक असून, त्याकरिता आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र या मुंबई शहरातील ५७ हजार ४१६ बेघर नागरिक व मुंबई महापालिकेने थर्ड पार्टी कंपनीमार्फत केलेल्या सर्व्हेनुसार ११ हजार ९१५ तसेच भिकारी संख्या २२७५ आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार २९ हजार भिकारी आहेत. मात्र बेघरांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या अंदाजानुसार मुंबईत एक लाखापेक्षा अधिक श्रमिक बेघर आहेत. या घटकांकरिता चालू असलेल्या कोविन लसीकरणाच्या मोहिमेमध्ये ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्याला तुम्ही कसे सहभागी करणार, असा प्रश्न सीपीडी संस्थेचे समन्वयक जगदीश पाटणकर यांनी उपस्थित केला आहे.
------------------
आधार कार्ड नाही त्यांचे लसीकरण कसे होणार?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील एक लाख लोकसंख्येमागे एक निवारा असले पाहिजे.
मात्र मुंबई महानगरपालिकेने मागील दहा वर्षात फक्त २१ निवारे बांधले आहेत. त्यातील १६ निवारे हे विशेष प्राधान्य म्हणून लहान मुलांकरिता चालू केले आहेत.
या निवाऱ्यामध्ये एक हजारच्या आसपास मुले आणि मुलींना निवारा देण्यात आला आहे. मात्र जे निवाऱ्याबाहेर रस्त्यावर आणि इतर ठिकाणी राहत आहेत त्यांना आधार कार्ड आणि इतर ओळखीचे पुरावे कोण आणि कसे देणार?
------------------
मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाच्या मोहिमेमध्ये या समाज घटकांना सामावून घेण्यासाठी त्वरित श्रमिक बेघर आणि भिक्षेकरी यांना आधार कार्ड बनवून दिले पाहिजे. तसेच महापालिकेच्या नियोजन विभागाने आरोग्य विभागाशी समन्वय करून लसीकरणाचा लाभ या समाजघटकांसाठी उपलब्ध करून द्यावा.
- जगदीश पाटणकर, समन्वयक, सीपीडी संस्था
------------------
- शासनाच्या सर्व्हेनुसार मुंबईतील बेघरांची संख्या ही ५४ हजार ४१६
- अभ्यासानुसार ही संख्या दोन लाखांपेक्षा जास्त
- एक लाख लोकसंख्येच्या पाठीमागे एक निवारागृह गरजेचे
- १२५ निवारागृहे आवश्यक
- २०१४ ते २०१९ महानगरपालिकेच्या अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या निवारागृहांची आकडेवारी ९
- १० निवारागृहे ही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालत आहेत
------------------
- भारतात ०.३१ मिलियन लोक बेघर आहेत.
- ०.२३ मिलियन बेघर लोक हे निवारागृहात राहताना दिसून येतात.
- २०१७ अहवालानुसार आतापर्यंत १,३३१ निवारागृहांना अनुमती दिली आहे.
- त्यातील फक्त ७८९ (५९%) निवारागृहे सध्या सुरू आहेत.
- एकूण बेघर लोकसंख्येच्या ४.५ % लोकसंख्येला निवारा आहे.
- आकडेवारीनुसार भारतात १६,९३९ निवारागृहांची बेघरांसाठी आवश्यकता आहे.
------------------
बेघर नागरिक
- हे बेघर लोक फुटपाथ, ब्रिजच्या खाली, मंदिराजवळ, स्टेशनवर, स्टेशनच्या बाहेर इतरत्र जागा मिळेल तिथे राहतात.
- पोटाची खळगी भरत नाही म्हणून कुटुंबाची कुटुंबे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबईत स्थलांतरित होत आहेत. मिळालेच कुठे काम तर दिवसभर काबाडकष्ट करून जोडीला ६०० ते ६५० रुपये मिळतात.
- न्यायालयाच्या निर्णयानुसार या बेघर लोकांना निवारा मिळावा म्हणून निवारागृह निर्माण केली जावीत, अशी तरतूद आहे. परंतु तुटपुंजी निवारागृहे असल्याने या लोकांना असेच उघड्यावर राहावे लागत आहे.