Join us

आता चाचणीशिवाय प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:07 AM

मॉल्स, पब, लांब पल्ल्याचे रेल्वेस्थानक, एसटी बसस्थानकांसाठी नियमलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गर्दीवर नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने मॉल्स, पब ...

मॉल्स, पब, लांब पल्ल्याचे रेल्वेस्थानक, एसटी बसस्थानकांसाठी नियम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गर्दीवर नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने मॉल्स, पब आदी ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र या ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. परिणामी रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने यापुढे मॉल, पब, व्यापारी संकुल, लांब पल्ल्याची रेल्वेस्थानके एसटीची बसस्थानके आदी ठिकाणी अँटिजन चाचण्या केल्या जाणार आहेत, असे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

मुंबईत गुरुवारी तब्बल २८७७ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेले काही दिवस रुग्णसंख्येत दररोज ४०० ते ५०० रुग्णांची वाढ होत आहे. याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी आता चाचणी आणि लसीकरण वाढवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच वाढत्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मॉल्स, पब, व्यापारी संकुल, चित्रपटगृह, रेल्वेस्थानके, बसस्थानके आदी ठिकाणी प्रत्येकाची अँटिजन चाचणी करूनच प्रवेश दिला जावा, असेे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने अशा प्रकारच्या चाचण्या केल्याशिवाय मॉल्स, पब, रेल्वेस्थानके व बसस्थानकांमध्ये प्रवेश देऊ नये, असे आयुक्तांनी आरोग्य विभागासह विभाग कार्यालयांना बजावले आहे. अँटिजन चाचणीचा अहवाल १५ मिनिटांत मिळत असल्याने बाधित रुग्ण शोधणे सहज शक्य होईल, असा पालिकेचा विश्वास आहे. तसेच लसीकरणाची संख्याही अधिकाधिक वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दिवसभरात २३,२०० नागरिकांना लस

मुंबई महापालिका व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये २३,२०० नागरिकांना दिवसभरात लस देण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या रुग्णालयांसह केंद्रांमध्ये १४,९००, तर राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये १,१०० आणि खासगी रुग्णालयांमध्ये ७,२०० जणांचे लसीकरण करण्यात आले.