मुंबई : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे असलेले पुरातन हनुमान मंदिर बेकायदेशीर असल्याची नोटीस रेल्वे प्रशासनाने दिली होती. त्याला शिवसेनेने विरोध दर्शविला होता. सध्या कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे जुने हनुमान मंदिर बेकायदेशीर आहे. दादर स्थानकावर विकासात्मक कामे करण्यासाठी बेकायदेशीर असलेले मंदिर तत्काळ हटविण्याची आवश्यकता आहे. सात दिवसाच्या आत हे मंदिर हटविण्यात यावे, अशी नोटीस मध्य रेल्वेने मंदिर प्रशासनाला दिली होती. त्यावर केंद्र सरकारची मंदिरांबाबत दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे राममंदिर बांधण्याबाबत आक्रोश करायचा, तर दुसरीकडे रामाचा दूत हनुमान यांचे मंदिर तोडण्यासाठी नोटिसा बजावायच्या. हे मंदिर ७५ वर्षे जुने आहे. या परिसरातल्याच नाही तर येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराला धक्का लागू देणार नाही, मार्ग निघाला नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी दिला होता.
----
दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडेचे जुने हनुमान मंदिर बेकायदेशीर आहे. दादर स्थानकावर विकासात्मक कामे करण्यासाठी सात दिवसात ते हटविण्यात यावे, अशी नोटीस देण्यात आली होती. परंतु सध्या कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही.
वरिष्ठ अधिकारी, मध्य रेल्वे