मुंबई : कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर हुक्का पार्लरवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. मात्र, या दुर्घटनेनंतर बेकायदा बांधकामांवर कारवाई करणा-या पालिका प्रशासनाने या आगीचे कारण असलेल्या हुक्का पार्लरना अभय दिले आहे. हुक्का पार्लरवर कारवाईबाबत कोणताच नियम नसल्याची हतबलता प्रशासनाने व्यक्त केली. त्यामुळे संतप्त विधि समितीने सभा तहकूब केली.कमला मिल परिसरातील मोजोज बिस्टो आणि वन अबव्ह या दोन पबला आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला. मोजोजमधील हुक्क्यातील निखारा उडून ही आग लागल्याचे समोर आले आहे.हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती, तर माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी आपल्या कार्यकाळात हुक्का पार्लरविरुद्ध मोहीम उघडली होती. मुंबईत अनेक ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहेत. त्याविरोधात पालिकेचे आरोग्य अधिकारी कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न विधि समिती सदस्यांनी उपस्थित केला होता.कमला मिलसारख्या दुर्घटना रोखण्यासाठी आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने हुक्का पार्लरविरोधात आयपीसीच्या २८५ कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक अनिश मकवाणी यांनी केली. मात्र, हुक्का पार्लरवर पालिकेच्या अधिनियमाखाली कारवाई करणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे संतापलेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानुसार विधि समिती अध्यक्ष सुहास वाडकर यांनी सभा तहकूब केली.रात्री दीडपर्यंत दणदणाटबीअर बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, डिस्को थेक सकाळी ११.३० वा. उघडून मध्यरात्री दीड वाजता बंद करण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे.राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने अधिसूचना काढून एक प्रकारे हुक्क्याला परवानगीच दिली आहे. आत्तापर्यंत हुक्का पार्लरला पालिकेकडून परवानगी मिळत नव्हती. मात्र, या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ लागू झालेला आहे. त्यानुसार बीअर बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, डिस्को थेक, दारू व मद्याची दुकाने, सिनेमागृहे उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या यादीत हुक्का पार्लरचाही समावेश करण्यात आला आहे.
हुक्का पार्लरवर कारवाई नाहीच!, नियम नसल्याचे कारण केले पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 2:43 AM